शहरात पोलिसांचा कडेकोट फौजफाटा
नाशिक, ता. १७ : सोमवारी (ता. १४) वाजतगाजत श्री गणरायाचे आगमन झाले. श्रींच्या आगमनामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही उत्साह संचारला असून, आरास व देखाव्यांची कामे जोमाने केली जात आहेत. दरम्यान, येत्या शनिवार- रविवार सुट्टी असल्याने भाविकांची रात्री उशिरापर्यंत आरास व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या देखावे पाहण्याच्या आनंदावर पावसाचे सावट असणार आहे. तर, दुसरीकडे गणेशोत्सवासाठीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून सायंकाळी वाहतूक मार्गात बदलही करण्यात आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून जादा पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या सहावा - सातवा दिवस शनिवार-रविवार आहे. याच दिवशी औद्योगिक वसाहतीला सुटी असते. शासकीय कार्यालयासह काही खासगी आस्थापनांनाही सुट्टी असते. त्यामुळे सुट्टीची संधी साधून शनिवारी सायंकाळनंतर भाविक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी घराबाहेर मोठ्या संख्येने पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी होण्याची दाट शक्यता गृहित धरून पोलिस यंत्रणेकडून जादा बंदोबस्ताचे नियोजनही करण्यात आलेले आहे. गणेशोत्सव काळात शहराच्या मुख्य भागात होणाऱ्या गर्दीची शक्यता गृहित धरून शहर पोलीस वाहतूक शाखेने काही रस्त्यांवर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहर बसेस, अवजड वाहने, चारचाकी वाहनांसह वाहतुकीला प्रवेश बंदी केली आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलेले आहे. विशेषतः रविवार कारंजा, अशोकस्तंभ, शालिमार, भालेकर मैदान या परिसरातून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीला सुमारे दीड हजार होमगार्ड, राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्यात दाखल झाल्या आहेत. तर, परजिल्ह्यातील सुमारे ५०० पोलिस अंमलदारांचा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.