फोटो : B60923,24,26
अधिकाऱ्यांनी आदिवासींशी संवाद तोडला; म्हणूनच चीड
मंत्री प्रा. उईके : सेवा संकल्प अभियानास नाशिकमध्ये प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : आदिवासी समाज स्वभावाने साधा आणि नम्र आहे. मात्र, प्रशासनातील अधिकारी आणि समाजातील बांधव यांच्यात थेट संवादाचा अभाव निर्माण झाल्याने सामाजिक प्रश्न अधिक तीव्र होत आहेत. अधिकाऱ्यांनी आपुलकीने संवाद साधला, तर समाजातील चीड कमी होऊन अनेक प्रश्न संवादातूनच सुटतील, अशी खंत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली.
शहरातील गुरुदक्षिणा हॉलमध्ये गुरुवारी (ता. १७) आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रभारी आयुक्त गोपीचंद कदम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर आयुक्त दिनकर पावरा, दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, शबरी आदिवासी विकास व वित्त महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, उपायुक्त राजेंद्रकुमार हिवाळे, शशिकला अहिरराव, संतोष ठुबे, विनिता सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, एन. डी. गावित आदी उपस्थित होते.
मंत्री उईके यांच्या हस्ते महिला बचतगटांना धनादेश वितरित करण्यात आले. तसेच एकलव्य कुशल योजनेतील प्रशिक्षणार्थींना नियुक्तिपत्रे देण्यात आली. नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रचार-प्रसिद्धी रथाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
डीबीटीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना बंद करण्यात आली. मात्र, आता याच मुद्द्यावर विद्यार्थ्यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना डीबीटी हवी आहे, तर काहींचा त्याला विरोध आहे, असे मंत्री उईके यांनी सांगितले.
पेसा क्षेत्रातील १७ पैकी केवळ नऊ संवर्गांत नोकरभरतीला सध्या परवानगी आहे. त्यामुळे पात्र आदिवासी युवक-युवती शासकीय नोकरीपासून वंचित राहत आहेत. येत्या सहा महिन्यांत पेसा क्षेत्रातील १०० टक्के नोकरभरती केली जाईल, अशी ग्वाही उईके यांनी दिली. बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविण्याचा प्रकार गंभीर असून, रिक्त अधिसंख्य पदेही सहा महिन्यांत भरण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एक तास द्या’
आदिवासी समाजातील मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यांचा उत्साह वाढविण्यासह त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक तास विद्यार्थ्यांसाठी द्यावा, असे आवाहन उईके यांनी केले. प्रशिक्षण केंद्रांवर जाऊन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्यास त्यांना प्रेरणा मिळेल. त्यांच्या अडचणी समजून घेतल्यास प्रशासन आणि समाजातील दुरावा कमी होईल. संवाद वाढला तर प्रश्न सुटतील आणि प्रशासन समाजाशी एकरूप होईल, असेही उईके यांनी नमूद केले.