सेवा पंधरवड्याला तलाठी संपाचा फटका
महासंघाच्या मागण्यांवर तिसऱ्या दिवशी चर्चांच्या फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : तलाठ्यांनी पुकारलेला बेमुदत संपावर जिल्हा तलाठी महासंघ व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये गुरुवारी (ता.१७) दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झडल्या. पण, महासंघ मागण्यांवर ठाम असल्याने सलग तिसऱ्या दिवशी महसूलचे कामकाज ठप्प आहे. या संपामुळे राज्य सरकारच्या सेवा पंधरवड्याला पहिल्याच दिवशी फटका बसला.
इगतपुरी तालुक्यातील पाच तलाठी व एका मंडलाधिकाऱ्यावरील कारवाईविरोधात जिल्हा तलाठी महासंघाने संपाचे हत्यार उपसले आहे. तीन दिवसांपासून सुुरु असलेल्या या संपात ७११ तलाठी तसेच १२१ मंडलाधिकारी सहभागी झाले आहेत. परिणामी गावपातळीपासून ते शहरापर्यंत या संपाची झळ जाणवत आहे. संपामुळे खरेदी-विक्री, दाखले, सातबारा नोंदी व फेरफारासह अन्य कामे ठप्प झाली आहेत.
राज्य सरकारने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या पंधरवड्यात आदिवासी वनपट्टेधारकांना हक्काच्या सातबाऱ्याचे वितरण करायचे आहेत. तसेच जनतेला विविध सेवाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पण, संपामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात या अभियानाला धक्का बसला आहे. तलाठी व मंडलाधिकारी संपात असल्याने वरिष्ठ महसुल अधिकाऱ्यांनी पंधरवड्यातंर्गत जनतेच्या कामांना प्राधान्य दिले. दरम्यान, प्रशासनाकडून तलाठी महासंघाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, बिनशर्त कारवाई मागे तसेच इगतपुरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता यांच्या बदलीवर महासंघ ठाम असल्याने चर्चा निष्फळ ठरल्या. या संपामुळे शेतकरी व सर्वसामान्यांची मात्र हाल होत आहेत.