फोटो -NSK26H29904
पंचवटी : येथील त्रिमूर्तीनगर मित्र मंडळाने साकारलेला खड्ड्यांचा देखावा.
त्रिमूर्तीनगर मंडळाने साकारला
नाशिकच्या खड्ड्यांचा देखावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : पंचवटी येथील हिरावाडी रोड परिसरात त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मित्र मंडळाने यंदा नाशिकचे खड्डे व खड्ड्यांमुळे गेलेले बळी यावर लक्ष वेधणारा देखावा साकारला आहे.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाद्वारे समाजप्रबोधन करायला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सवात समाजात प्रबोधन करण्यासाठी देखाव्याची मदत घेतली जाते. असाच समाजप्रबोधनपर देखावा हिरावाडी रोड येथील त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व मदत फाउंडेशनने साकारला आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेले अपघात, मृत्युमुखी पडलेले नागरिक, नाशिकमधील वृक्षतोडीमुळे होत असलेले प्रदूषण व नाशिकमधील रस्त्यावरील वाहतूक कोंडी यासारख्या विविध प्रश्नांचा जाब गणपती बाप्पा या देखाव्यात विचारत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत हे काम होईल की नाही, असा नाशिककरांना पडलेला प्रश्न आता गणपती बाप्पा देखील विचारत असलेला देखावा त्रिमूर्ती नगर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी साकारला आहे.