शहर टुडे पानासाठी
NSK26H29908
जळगाव : मक्तेदार व शहर अभियंता योगेश बोरोले यांच्याकडून कचरा संकलन केंद्राच्या कामाचा आढावा घेताना उपमहापौर मनोज चौधरी. सोबत नगरसेवक अमर जैन.
............
कचरा संकलन केंद्र हलविण्यासाठी हालचालींना वेग
------
टी.बी. केंद्रातील रॅम्पचे काम तातडीने पूर्ण करण्याचे उपमहापौरांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या(आयटीआय) प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.१७) आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी यांनी याप्रकरणी तातडीने आपल्या दालनात बैठक घेतली.
या बैठकीत शहर अभियंता योगेश बोरोले, नगरसेवक अमर जैन, प्रकल्प अभियंता योगेश वाणी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक व अभियंते यांची उपस्थिती होती. टी. बी. केंद्रातील रॅम्पचे काम उद्यापासून कोणत्याही परिस्थितीत वेगाने सुरू करून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर चौधरी यांनी दिल्या. ‘आयटीआय’समोरील कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, परिसरातील स्वच्छता व सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्थलांतराची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
कचरा संकलन केंद्राचे काम ७० टक्के
‘आयटीआय’समोरील कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हे केंद्र कायमस्वरूपी अन्यत्र हलविण्याबाबत चर्चा झाली. टी.बी. केंद्राच्या जागेवर नवीन कचरा संकलनाचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले असले तरी वाहनांसाठी तयार केले जाणारे रॅम्पचे काम बाकी आहे, हे काम पूर्ण झाल्यानंतर ‘आयटीआय’समोरील केंद्र बंद केले जाणार आहे. हे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.