अन्यथा संचालकांच्या मालमत्ता जप्ती करु

अन्यथा संचालकांच्या मालमत्ता जप्ती करु
Published on
नासाकाच्या थकीत देण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका चार दिवसांत आर्थिक आराखडा सादर करा; अन्यथा कंपनीसह संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तांवर आरआरसीने जप्तीचा इशारा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : नाशिक सहकारी साखर कारखान्यातील (नासाका) शेतकरी, कामगार आणि बँकेच्या थकीत देण्यांवरून प्रशासनाने अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. थकीत देणी कधी आणि कशी भागविणार, याचा ठोस आर्थिक आराखडा चार दिवसांत सादर करा; अन्यथा कंपनीसह संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तांवरही महसूल वसुली प्रमाणपत्राद्वारे (आरआरसी) जप्तीची कारवाई केली जाईल, असा थेट इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कंपनीला दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. १७) नासाकाच्या आगामी गळीत हंगामासह थकीत देण्यांबाबत बैठक झाली. खासदार राजाभाऊ वाजे, नासाका कृती समितीचे पदाधिकारी तसेच कारखान्याचे सभासद या वेळी उपस्थित होते. मात्र, कंपनीचे प्रमुख प्रसाद धावटे यांनी स्वतः उपस्थित न राहता वकिलांना पाठविल्याने प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली. नासाकाच्या मागील गळीत हंगामातील सुमारे ९०० शेतकऱ्यांचे तीन कोटी ९० लाख रुपये, तर कारखाना कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतन थकीत आहेत. त्यामुळे थकीत देणी भागविण्याबाबत कंपनीने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कालबद्ध आराखडा द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कंपनीची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी सर्व बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील आणि उपलब्ध निधीची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. थकीत देणी भागविण्यासाठी उपलब्ध आर्थिक स्रोतांचा वापर कसा केला जाणार, याचे स्पष्ट नियोजन करण्यासही कंपनीला सांगण्यात आले. साखर विकूनही देणी कायम नासाकातील साखर, मोलॅसिस आणि भुशाची विक्री झाल्यानंतरही शेतकरी व कामगारांची देणी कायम असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने अष्टलक्ष्मी कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस बजावल्याची माहिती बैठकीत समोर आली. दरम्यान, कारखान्याचे सुमारे १५ लाख रुपयांचे वीजबिल सहा महिन्यांपासून थकीत असल्याने कारखाना परिसरातील वीजपुरवठाही बंद आहे. त्यातच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुद्दल व व्याज मिळून सुमारे १३२ कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याची माहिती समोर आल्याने नासाकाच्या आर्थिक संकटाची तीव्रता अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com