ॲंकर
NSK26H29919
जळगाव : भावी अभियंता, तंत्रज्ञ विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करताना उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा.
---
एआय, ‘डीपफेक’च्या युगात सतर्कता बाळगा
मिर्झा : ‘गोदावरी’त सायबर फसवणुकीपासून बचावासाठी मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : अभियंता दिनानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत ‘सायबर क्राइम आणि डिजिटल फ्रॉड’ विषयावर सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी मार्गदर्शन केले. एआय, ‘डीपफेक’सह सायबर फसवणुकीच्या आधुनिक प्रकारांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा आणि फसवणूक टाळण्याचा मूलमंत्र दिला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या सायबर गुन्हेगारी व डिजिटल फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा पोलिस दल विविध उपक्रम राबविते. अभियंता दिनानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर गुन्हेगारी, एआय व डीपफेक विषयावर व्याख्यान झाले.
पोलिस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास, फिशिंग, डिजिटल फसवणुकीच्या आधुनिक पद्धती, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत माहिती दिली. सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, ओटीपी, बनावट लिंक यांचा वापर करताना सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासोबतच समाजातही सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
प्रश्नोत्तरांतून माहितीची उकल
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक प्रा. जयश्री सोनावणे, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे, ॲकॅडमिक डीन प्रा. नितीन पाटील, तसेच सर्व विभागांच्या प्रमुखांसह प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सचिव वर्षा पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.