सेवा संकल्पात ‘प्रशासन आपल्या दारी’
पाचही जिल्ह्यांना आयुष प्रसादांचे अंमलबजावणीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : नावीन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध शासकीय सेवा व लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प अभियानातून तयारी करण्यात आली आहे.
नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांनी विविध प्रशासकीय विभागाच्या सहाय्याने त्याची अंमलबजावणी करावी. तसेच व्यापक प्रमाणात सर्वसामान्यांपर्यंत सेवा पोहचावाव्या, अशा सूचना प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली
राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाची अंमलबजावणी तसेच पाचही जिल्ह्यांनी केलेल्या नियोजना संदर्भात गुुरुवारी (ता.१७) बैठक पार पडली. त्याप्रसंगी आयुष प्रसाद बोलत होते. बैठकीमध्ये धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, पाचही जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. तर प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभागी आयुक्त प्रसाद म्हणाले, तालुकास्तरावर सेवा सेतू अभियानांतर्गत शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे आयोजित करून शासनाच्या विविध सेवांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवावे. राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक व कॉर्पोरेट इनोव्हेटर्स व ग्रामीण भागातील नवीन समाधाने विकसित करणाऱ्या लोकांना जोडण्यासाठी राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केला. लोकसहभागून रक्तदान, स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी मोहीम राबवावी. शासकीय व खाजगी शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा
प्रत्येक जिल्ह्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे. एका जिल्ह्यातील चांगल्या उपक्रमांची विभागातील इतर जिल्ह्यांनीही अंमलबजावणी करावी. थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत जाईल यादृष्टीने नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित आहे. यापूर्वी राबविलेल्या अभियानातील उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक चांगले योगदान प्रत्येक जिल्ह्याचे अपेक्षित असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.