NSK26H29922
नंदुरबार : हरविलेले मोबाईल मूळ मालकांना परत करताना जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप.
---
हरवलेले ५८ मोबाईल मूळ मालकांना परत
शहर पोलिसांकडून आठ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नंदुरबार : हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. गुन्हे शोध पथकाने विविध गुन्ह्यात आठ लाख ९६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. यात मूळ मालकांचा शोध घेऊन मोबाईल त्यांना परत करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली आहे.
नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन हरविल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन गुन्हे शोध पथकाने तपास करून एकूण ५८ मोबाईल शोधून हस्तगत केले होते. पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याहस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले. नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथील गुन्हे शोध पथकात कार्यरत पोलिस हवालदार पंकज महाले व रवींद्र बिल यांनी पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून हरविलेले मोबाईल शोधून काढले.
हरविलेले मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल नीलेश मराठे व ठगूबाई कुवर यांनी पोलिस दलाचे आभार मानले. विनोद तायडे, प्रकाश माळी, शैलेश चौधरी, गोरख जाधव, राकेश पाटील (सर्व रा. नंदुरबार) यांना फोन परत करण्यात आले. नागरिकांचे मोबाईल हरविल्यास त्यांनी तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. मोबाईलचा आयएमईआय क्रमांक व इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून दिल्यास मोबाईलचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होते. यापूर्वी मोबाईल हरविल्याबाबत तक्रार केलेल्या नागरिकांनी त्यांचा मोबाईल पोलिसांकडून शोधून हस्तगत झाला आहे का, याबाबत संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंकज महाले, रवींद्र भिल यांनी केली आहे.