NSK26H29928
जळगाव : न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी कर्मचारी.
---------
काळ्या फिती लावून न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
उपशीर्षक
‘समान काम, समान वेतन’ मागणीसाठी शासनाचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे नुकतेच काळ्या फिती लावून शांततामय आंदोलन करण्यात आले.
उच्च न्यायालयाने दोन न्यायमूर्तींची समिती स्थापन करून दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावर होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आंदोलनादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी शांतता, शिस्त व संयम राखत काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदविला. विशेष म्हणजे, न्यायालयीन कामकाजात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली.
चौकट
‘वेतनश्रेणीचा प्रश्न त्वरित मार्गी लावा’
‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आजचे आंदोलन शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व यशस्वीरीत्या पार पडल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. शासनाने उच्च न्यायालयाकडून प्राप्त प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्याम शिंदे व संघटनेचे पदाधिकारी यांनी केली.
--