सय्यदपिंप्रीत ४९ लाखांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरूच
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरूच आहे. सय्यदपिंप्री येथील छाया ॲग्री प्रा. लि. येथे छापा टाकून सुमारे ४८ लाख ८१ हजार ९२० रुपयांचे अन्नपदार्थ व खाद्यतेलाचा साठा गुरुवारी (ता. १७) जप्त केला. जप्त केलेल्या मालात ‘बेरिस्टा’ (तळलेला कांदा) व खाद्यतेलाच्या साठ्याचा समावेश आहे.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावे आणि अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ही कारवाई झाली आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. गुरुवारी केलेल्या या कारवाईत अस्वच्छ वातावरण, कमी दर्जा आणि असुरक्षित अन्नपदार्थांच्या संशयावरून, तसेच मानवी आरोग्यास हानी पोहचवेल, अशा स्थितीत साठवणूक केल्याचे उघडकीस आले. सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांचे नमुने घेतले असून, कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
असा आहे जप्त माल-
बेरिस्टा (तळलेला कांदा : ४८ लाख तीन हजार २०० रुपयांचा १२ हजार ००८ किलोग्रॅम)
रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल (खाद्यतेल) : (७८ हजार ७२० रुपयांचा ३२८ किलोग्रॅम)