NSK26H29938 : महर्षी दधीची
---
महर्षी दधीची जयंतीनिमित्त
आज शहरात भव्य शोभायात्रा
माल्यार्पणाने प्रारंभ; गुणवंतांचा होणार सन्मान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : दाधीच (दायमा) समाजाचे आद्यदैवत महर्षी दधीची ऋषी यांची जयंती शनिवारी (ता.१९) विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी शहरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त समाजातर्फे भव्य शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महर्षी दधीची चौकातील स्तंभाला सकाळी आठ वाजता माल्यार्पण करून शोभायात्रेला सुरुवात होईल. बँड पथक, सजविलेल्या वाहनावरील महर्षी दधीची ऋषींची प्रतिमा आणि समाजबांधवांचा सहभाग हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. महर्षी दधीची चौकातून सुरू होणारी शोभायात्रा त्रिपाठी मार्ग, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, श्री भवानी मंदिर, सुभाष चौक, दाणा बाजारमार्गे टॉवर चौकातून जिल्हा परिषदेजवळील महर्षी दधीची मंदिरात पोहोचेल. तेथे महाआरतीने शोभायात्रेचा समारोप होईल. यानंतर रायसोनी नगरातील महर्षी दधीची आश्रमात मुख्य कार्यक्रम होणार आहे. प्रतिमापूजन व आरतीनंतर ज्येष्ठ नागरिक, कन्यारत्न, पुत्ररत्न तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येईल. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येणार आहे. आमदार सुरेश भोळे व बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओम त्रिवेदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाप्रसादानंतर महिला मंडळाच्या धार्मिक व सांस्कृतिक स्पर्धा, दधिमती मंगलपाठ आणि सायंकाळी आरती होणार आहे. समाजबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दधीच नवयुवक मंडळ व महिला मंडळाने केले आहे.