‘केसीई’ वर्धापन दिनानिमित्त
नाट्यछटा स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१८ : केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात नाट्य विभागप्रमुख वैभव मावळे, ज्येष्ठ रंगकर्मी व स्पर्धेचे परीक्षक धनंजय राजहंस, मंजिरी राजहंस, मुख्याध्यापिका धनश्री फालक, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे तसेच एकनाथ पाचपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजनाने झाली.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘डीजे’चा भस्मासूर’, ‘मी प्लास्टिक बोलते’, ‘हिरकणी’, ‘माझे आभाळ माझे पंख’, ‘कंटाळा आलाय’, ‘शेतातली न्याहारी’, ‘मी गंगू’, ‘विसरभोळी गोदा’, ‘फुलराणी’, ‘मूषक राज’ आदी विषयांवर प्रभावी नाट्यछटा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
विजेत्या विद्यार्थ्यांचा केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर तसेच परीक्षक धनंजय राजहंस व मंजिरी राजहंस यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजन उपशिक्षक चंद्रकांत कोळी, योगेश भालेराव व पराग राणे यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र मिरकुटे व रत्नमाला शिंदे यांनी केले, तर उपशिक्षिका भावना धांडे व पल्लवी टोके यांनी सहकार्य केले.