शाळा दुरुस्तीचे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यावर

शाळा दुरुस्तीचे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यावर
Published on
फोटो : 29945/46/47/48 शाळा दुरुस्तीचे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यावर मंत्री दादा भुसे : जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : जिल्हा परिषद शाळेतील किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच किरकोळ दुरुस्तीची कामे तत्काळ करता यावीत, यासाठी थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन मुख्याध्यापकांनी हा निधी खर्च करायचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले. मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या (कै.) रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी (ता. १८) जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. व्यासपीठावर मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपमहापौर विलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, जयकुमार आढे, निवृत्त शिक्षक संजय कळमकर, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १५ गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शाळांमधील घटती विद्यार्थिसंख्या व मराठी वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याची चिंता मंत्री भुसे यांनी व्यक्त केली. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि प्रशासनाने सध्याच्या प्रयत्नांपेक्षा किमान २५ टक्के अधिक योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुरस्कार मिळाल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढली असून, गुणवत्ता शिक्षणासोबतच संस्कार देण्याचे काम तसेच परिसरातील शाळा आदर्श करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी सीईओ पवार, ॲड. ठाकरे, संजय कळमकर व पुरस्कारप्राप्त निवडक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले. फक्त शनिवारी माहिती पाठवा शाळाबाह्य कामांमुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. याविषयी बोलताना निवृत्त शिक्षक संजय कळमकर यांनी आपल्या विनोदी शैलीत ही व्यथा मांडली. शिक्षकांनी आनंदाने ज्ञानार्जनाचे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांचे शाळाबाह्य काम कमी करत शिक्षकांना आता फक्त शनिवारी माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाला शिक्षणमंत्री भुसे यांनी पुष्टी देत फक्त तातडीची बाब सोडून इतर सर्व माहिती शनिवारीच देण्याची सूचना त्यांनी शिक्षकांना केली. पुरस्कारार्थी शिक्षक बागलाण : माधुरी सुभाष पवार, चांदवड : सतीश भाऊसाहेब अहिरे, देवळा : सतीश गोविंदराव आहेर, दिंडोरी : भिलाजी माधवराव पाटील, इगतपुरी : अवधूत रामदास खाडगीर, कळवण : सविता तानाजी भामरे, मालेगाव : मीना निशा देवरे, नांदगाव : गणेश पुंडलिक साळी, नाशिक : विवेक पुंडलिक खैरनार, निफाड : गौरी राजेंद्र गायवन, पेठ : योगेंद्र गणपत बोरसे, सिन्नर : प्रकाश दत्तू जगताप, सुरगाणा : सुधाकर कृष्णा भोये, त्र्यंबकेश्वर : संदीप दत्तात्रय गुंजाळ, येवला : योगेश बाळासाहेब माकोणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com