धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो- NSK26H29973
धुळे ः महापालिकेच्या स्थायी समिती सभेत बोलताना सदस्य अमोल मासुळे. शेजारी सदस्य, अधिकारी.
---
शौचालयांचे ‘तीनतेरा’, ठेकेदार मात्र ‘तोच’ हवा!
मनपा स्थायी समितीची गत; ठेक्याला तीन वर्ष मुदतवाढ; समस्यांवर सदस्यांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेसह अस्वच्छतेबाबत प्रचंड संताप व्यक्त करणाऱ्या स्थायी समितीने याच सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाई, देखभाल दुरुस्तीचे काम पुढील तीन वर्षांसाठी ‘त्याच’ ठेकेदाराला देण्याचा अजबगजब निर्णय घेतला. प्रशासनानेही वाढीव खर्चाचे भूत दाखवत त्याला अप्रत्यक्षरीत्या समर्थन दिल्याचेही पाहायला मिळाले. दुसरीकडे शहरातील नाल्यांमधील प्रचंड घाणीचे फोटो दाखवत सत्ताधारी सदस्याने अशा परिस्थितीमुळे महापालिकेच्या इज्जतीचा पंचनामा होतो, असे सुनावले.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा सकाळी साडेअकराला महापालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाली. सभापती लताबाई पोतदार, उपायुक्त हेमंत निकम, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. धुळे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नवीन निविदा काढावी की कसे अर्थात नवीन निविदा काढावी की सध्याच्या ठेकेदारालाच मुदतवाढ द्यावी, याचा तुलनात्मक खर्चाचा विचार करून निर्णय घेण्याचा विषय समितीपुढे होता. या विषयाच्या अनुषंगाने सत्ताधारी भाजप सदस्यांनीच सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था व अस्वच्छतेबाबत वाभाडे काढले. सदस्य कृपेश नांद्रे यांनी त्याच रेटमध्ये ठेकेदार काम करत असेल तर काम देण्यास हरकत नाही, असे म्हणतानाच अधिकारी कधी शौचालयांची स्थिती पाहायला फेरी मारतात का, असा सवाल केला व आठवड्यातून किमान एक-दोनदा फेरी मारा, असा सल्ला दिला. सदस्य विक्रेम थोरात यांनी सध्या सर्व १३५ शौचालय सुरू आहेत का, अशी विचारणा करत बाळापूर येथील शौचालयाचे दरवाजे तुटले आहेत, फोटो दाखवू का? नगरसेवक सांगतील तेव्हाच काम करणार का, असे म्हणत संताप व्यक्त केला. सदस्या वंदना भामरे यांनीही हद्दवाढ भागातील शौचालयांची साफसफाई होत नाही, नगरसेवकांना फोन करावे लागतात, नगरसेवक मुकादम आहेत का, शौचालयांची अत्यंत दुरवस्था आहे, असे म्हणत संताप व्यक्त केला. सदस्य अमोल मासुळे यांनी शौचालय साफसफाई, देखभाल दुरुस्तीचे बिल मंजूर करण्यापूर्वी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांचे त्याबाबत पत्र घ्या, अशी सूचना केली व या विषयाबाबत प्रशासन सदस्यांवर घोंगडे टाकत असल्याचीही टिप्पणी केली.
तीन वर्ष मुदतवाढ
सद्यःस्थितीत शहरातील १३५ शौचालयांची साफसफाई व देखभाल-दुरुस्तीचे काम श्री चंद्रगणेश एन्टरप्रायजेस यांच्याकडून सुरू आहे. यासाठी मासिक नऊ लाख आठ हजार ८२०, तर वार्षिक एक कोटी नऊ लाख पाच हजार ८४० रुपये खर्च येतो. नवीन निविदेनुसार १६१ शौचालयांसाठी मासिक २१ लाख तीन हजार २९१, तर वार्षिक दोन कोटी ५२ लाख ३९ हजार ४९२ रुपये खर्च अपेक्षित आहे. अर्थात एक कोटी ४३ लाख ३३ हजार रुपये खर्च वाढणार आहे, असे नमूद करत नवीन निविदा काढायची की सध्याच्या ठेकेदाराला मागच्याच दरात काम द्यायचे, असा प्रश्न प्रशासनाने स्थायीपुढे ठेवला. सुमारे दीड कोटी रुपये खर्च वाढणार असल्याचे अधोरेखित झाल्याने सदस्यांनी सध्याच्या (श्री चंद्रगणेश एन्टरप्रायजेस) ठेकेदाराला तीन वर्ष मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. या वाढीव कामासाठी ठेकेदाराने वाढीव यंत्रसामग्री घ्यावी, असे श्री. मासुळे यांनी सुचविले.
नालेसफाईबाबत संताप
सदस्य थोरात यांनी प्रभागातील नाल्यात प्रचंड घाण साचल्याचे फोटो दाखवत यामुळे महापालिकेच्या इज्जतीचा पंचनामा होतो, असे म्हणत संताप व्यक्त केला. सदस्य आमीर पठाण यांनी घंटागाडी येत नसल्याची तक्रार केली, तसेच प्रभागात ड्रेनेज लाइनमुळे झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आता बोलायचीही इच्छा नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली.
---
चौकट
घंटागाडी गायब, स्कॅनिंग मात्र सुरू
सदस्य मासुळे यांनी अजळकरनगरमध्ये घंटागाडी जात नाही, पण कर्मचारी दुचाकीवर येऊन कोड स्कॅन करतो व त्यातून रोज घंटागाडी येत असल्याचे दाखविले जाते. असे दहा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगत व्हिडिओ दाखविला. मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे अकार्यक्षम असल्याने त्यांची बदली करावी, अशी मागणीही त्यांनी केली.