धुळे ः टुडे २ किंवा ३ साठी
---
फोटो क्रमांक ः 29976
धुळे ः महापालिकेविरोधात आंदोलन करताना भारतीय संविधान सेनेचे आंदोलक.
---
मनपा भूमिकेविरोधात बेमुदत उपोषण
भारतीय संविधान सेनेच्या दोन आंदोलकांची प्रकृती खालावली
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : शहरातील जुन्या महापालिकेचे मागील गेट उघडणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आदी विविध मागण्यांसाठी भारतीय संविधान सेनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने शुक्रवारी (ता. १८) बारावा दिवस पूर्ण केला. मात्र, महापालिका प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही ठोस दखल न घेतली गेल्याने आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे. यात तीन नव्या सदस्यांनी उपोषणात सहभाग घेतला असून, प्रशासनाच्या निरुत्साही भूमिकेबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने राजकीय दबापोटी दुजाभाव चालवल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या मागण्या अशा ः मनपा क्षेत्रातील ‘बाबासाहेब कोतवाल ट्रस्ट’चे अनधिकृत बांधकाम तत्काळ काढावे, जुन्या मनपचे बंद मागील गेट सर्वसामान्यांसाठी तत्काळ खुले करावे, आंदोलन स्थळावरील महिला व कार्यकर्त्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि दर्जेदार स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी.
आंदोलनकर्त्यांचा इशारा
यापूर्वी उपोषणकर्ते आबा अमृतसागर आणि दावल वाघ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज भासली. प्रशासनाने अद्यापही लिखित किंवा कालबद्ध निर्णय न दिल्याने शुक्रवारपासून आशाबाई दावल वाघ, अभियंता रवी पवार, ज्योती रावत, चिंतामण थोरात, कल्पना इंदवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू असताना किंवा या आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकाच्या जिवास किंवा आरोग्यास काहीही इजा पोहोचल्यास, त्याची सर्वस्वी कायदेशीर, नैतिक व फौजदारी जबाबदारी महापालिका आयुक्त, तसेच संबंधित अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.