टुडे एक : मेन फिचर
NSK26H30002
जळगाव : मोहन नगरातील मुख्य रस्त्यांवर नळजोडणी खोदलेल्या रस्त्यांची स्थिती.
NSK26H30003
साई हाईट्सजवळील काँक्रिटचा खोदलेला रस्ता.
----
रस्ते खोदकामाचा त्रास; दुरुस्तीच्या नावाखाली मलमपट्टी
नळजोडणी, भूमिगत केबलसाठी रस्ते खोदले; निकृष्ट डागडुजीमुळे पुन्हा खड्डे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : शहरातील विविध भागांत नळजोडणी, भूमिगत केबल तसेच अन्य सुविधांच्या कामांसाठी रस्ते खोदले जातात. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते पूर्ववत करण्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना खड्डे, उंच-सखल रस्ते आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी डांबरी रस्ते खोदून त्यावर केवळ मुरूम किंवा निकृष्ट पद्धतीने डागडुजी केली जात असल्याने काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्ता खोदाईला परवानगी देताना आकारण्यात येणारे शुल्क आणि प्रत्यक्षात होणारी रस्त्यांची दुरुस्ती यामध्ये ताळमेळ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्ता खोदण्यासाठी परवानगी देताना संबंधितांकडून शुल्क आकारले जाते. त्यामुळे केवळ खोदकामाला परवानगी देणे पुरेसे नसून, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्वीच्या दर्जानुसार पूर्ववत झाला की नाही, याची तपासणी करण्याची यंत्रणा महापालिकेने प्रभावी करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या पुनर्स्थापनेत त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदार किंवा कंपनीवर जबाबदारी निश्चित करून दुरुस्ती करून घेण्याची मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली आहे.
केबलसाठी खोदकाम
नळजोडणीबरोबरच विविध मोबाईल कंपन्यांकडून भूमिगत केबल टाकण्यासाठी शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते पूर्ववत करताना आवश्यक दर्जा राखला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. परिणामी वाहतुकीच्या मार्गावर खड्डे आणि असमतोल पट्टे तयार होऊन दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
एकत्रित तपशील ठेवण्याची आवश्यकता
शहरातील विविध भागांत रस्ता खोदाईनंतर निर्माण झालेल्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने रस्ता खोदकामाला परवानगी, शुल्क, प्रत्यक्ष काम आणि पुनर्स्थापना यांचा एकत्रित तपशील ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रस्ते वारंवार खोदले जाणे आणि त्यानंतर निकृष्ट दुरुस्ती होण्याच्या प्रकाराला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
वेगळी चौकट
रस्तेप्रश्न नगरसेविका वैशाली पाटील आक्रमक
प्रभाग क्रमांक १३ मधील रस्ता खोदाईचा प्रश्न नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. महाबळ कॉलनी, संभाजीनगर, आदर्श नगर, संत गाडगेबाबा चौक, नेहरू नगर, मोहन नगर, रायसोनी नगर, महाडी रोड आदी परिसरातील नळजोडणीसाठी खोदलेल्या रस्त्यांची संयुक्त पाहणी करून नोंदणी करावी आणि संबंधित रस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ववत करावेत, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नळजोडणीसाठी नागरिकांकडून नियमानुसार शुल्क घेतले जाते. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता योग्य पातळीवर आणि दर्जाने पूर्ववत झाला आहे की नाही, याची तपासणी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक नळजोडणीचा क्रमांक, खोदाईचे ठिकाण, आकारलेले शुल्क, रस्त्याचा प्रकार आणि करण्यात आलेली दुरुस्ती याची नोंद ठेवून १५ दिवसांत लेखी अहवाल द्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.