जळगावात बंद डाळ मिलमध्ये
गॅस कटरच्या ठिणगीने आग
---
जीवितहानी टळली; भंगार आगीच्या भक्ष्यस्थानी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : येथील औद्योगिक परिसरातील एन सेक्टरमध्ये बंद पडलेल्या डाळ मिलमधील मशिनरी गॅस कटरच्या सहाय्याने कापताना ठिणगी उडून भंगार साहित्याला आग लागली. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, आगीत कंपनीतील काही भंगार साहित्य जळून नुकसान झाले.
एमआयडीसीतील एन सेक्टरमध्ये शांतीलाल देवीचंद जैन यांच्या मालकीची चिमणदास धीरजजी छोरिया पल्सेस नावाची डाळ मिल आहे. ही मिल काही काळापासून बंद आहे. शुक्रवारी सायंकाळी मिलमधील जुनी मशिनरी गॅस कटरच्या सहाय्याने कापणे सुरू होते. अचानक गॅस कटरमधून ठिणगी उडाली. ही ठिणगी भंगार साहित्यावर पडल्याने काही वेळातच आगीने पेट घेतला.
आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थितांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. त्यापैकी दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे आग परिसरात पसरण्याचा धोका टळला.
चौकट
अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, मिलमधील भंगार साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नुकसान झाले. गॅस कटरच्या कामादरम्यान सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबतही चर्चा सुरू होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.