चांदवड येथे विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू
वडिलांचा जावयावर आरोप नसल्याचा जबाब
सकाळ वृत्तसेवा
गणूर (चांदवड), ता. १८ : चांदवड येथे एका विवाहितेने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याची घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहिता शेलकेनगर (चांदवड) येथे राहत होती. तिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेहाचा व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन व व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांकडे जबाब देताना जावयाबाबत कोणताही आरोप नसल्याचे सांगितले असून, ‘माझा जावई देवमाणूस आहे. तो असे कुठलेही कृत्य करणार नाही,’ असे म्हटले आहे.
या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चांदवड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कोट
या प्रकरणाचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
- अभिजित सोनवणे, पोलिस निरीक्षक, चांदवड