सुरगाणा तालुक्यात
३.३ तीव्रतेचा धक्का
रात्री पुन्हा जाणवला हादरा
सुरगाणा, ता. १८ : तालुक्याच्या घाटमाथ्यावरील डांगराळे, शिंदे दिगर, रोकडपाडा, कुंभीपाडा आणि भरडमाळ परिसराला शुक्रवारी (ता.१८) रात्री भूकंपाचा धक्का जाणवला. रात्री ७.१९च्या सुमारास जाणवलेल्या पहिल्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार नाशिक जिल्ह्यात रात्री ७.१० वाजता ३.३ तीव्रतेचा भूकंप नोंदला गेला. त्याची खोली चार किलोमीटर होती.
शिंदे दिगर येथील पोलिस पाटील काशिनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीची आरती सुरू असताना गावकरी मोकळ्या मैदानात जमले होते. त्याचवेळी जमीन जोराने हादरल्याचे जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. रामजी भोये, पुंडलिक पवार, प्रकाश गावित आणि योगेश पवार यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
रोकडपाडा येथील सरपंच गोविंद भोये यांनी परिसरात यापूर्वीही भूकंपाचे अनेक धक्के जाणवल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, हा परिसरातील पंधरावा-सोळावा धक्का आहे. शुक्रवारी रात्री १०.४०च्या सुमारासही कमी तीव्रतेचा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, भरडमाळ परिसरातील जमिनीला यापूर्वीच मोठ्या भेगा पडल्या असून तलाठ्यांनी त्याची पाहणी केली आहे. दिंडोरी तालुक्यातील भनवड ते गोगुळदरम्यान शिंदपाडा परिसरात भूकंपाचे केंद्र असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या केंद्राबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.
रोकडपाडा येथे सीताराम खांडवी, रोहिदास वाघमारे, कांतिलाल खांडवी आणि प्रकाश गवळी यांनी जमीन हादरल्याचे जाणवल्यानंतर घराबाहेर पडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.