NSK26H30028
जळगाव : राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावलेल्या शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांचा संघ.
विज्ञान नाट्य महोत्सवात ‘शानभाग’ प्रथम
‘क्षीरसागर ते महामंथन...’ नाट्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : शिक्षण विभाग, पंचायत समिती यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ‘क्षीरसागर ते महामंथन : महासागराचे पुनरुज्जीवन’ या विज्ञान नाट्याचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. त्यामुळे विद्यालयाची जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प. न. लुंकड कन्या शाळेत १७ सप्टेंबरला झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांचे दहा संघ सहभागी झाले होते. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रभावी अभिनय आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख मेळ साधत नाट्य सादर केले. पर्यावरण संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या पुनरुज्जीवनाचा संदेश नाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला. या कार्यक्रमास जळगाव प्रशासनाधिकारी खलील शेख, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, जितेंद्र चिंचोले, तालुका विज्ञान समन्वयक गोपाळ महाजन, भाग्यश्री तळेले यांच्यासह विविध शाळांतील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन, तर वैशाली पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.