टुडे पान ३ : मेन फिचर
NSK26H30031
जळगाव : मेहरुण तलाव येथील गणेश घाटाच्या पाहणीप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने आदी नगरसेवक व अधिकारी.
--
गणेश घाटावर मंत्री महाजन यांच्याकडून पाहणी
विसर्जन व्यवस्थेचा आढावा; आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : महापालिकेच्या वतीने आयोजित ‘जळगावचा मानाचा गणपती’ गणेशोत्सवांतर्गत शुक्रवारी (ता. १८) मानाच्या गणपतीची महाआरती भक्तिमय वातावरणात झाली. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी महाआरती करून गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी मंत्री महाजन यांनी मनपाकडून राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच महाआरतीनंतर महाजन यांनी मेहरूण तलावावरील गणेश घाटाची पाहणी करून विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले नियोजन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापनाची तयारी तसेच विविध सोयी-सुविधांची त्यांनी माहिती घेतली. घाटावर कार्यरत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता अधिकारी-निरीक्षक आणि सफाई कामगारांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
चौकट
अहोरात्र सेवा देणाऱ्यांचा गौरव
यावेळी सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गणेशोत्सव काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महाजन यांनी विशेष कौतुक केले. महापालिकेच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक व महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.