टुडे एक : फ्लायर
(एआय चित्र वापरावे)
--
''डिजिटल अरेस्ट''ची भीती दाखवून निवृत्त बँक कॅशियरला गंडा
जळगावात गुन्हा दाखल; सायबर गुन्हेगारांकडून २३ लाख ४० हजारांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : दिल्ली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग व मानवी तस्करी प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत जामनेर येथील एका निवृत्त बँक कॅशियरची २३ लाख ४० हजार ७० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील शिवशक्ती नगर येथील रहिवासी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कॅशियर माणिक मारूती घुले (वय ७२) यांना १० ऑक्टोबर २०२५ रोजी एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःचे नाव ''दीपक शर्मा'' सांगून तो दिल्ली पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून माणिक घुले यांच्या नावाने आणि आयडीचा वापर करून सिमकार्ड व कॅनरा बँकेत बनावट खाते उघडून मनी लाँड्रिंग व मानवी तस्करीचे कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे सांगितले.
धमकीनंतर...
या सायबर गुन्हेगारांनी खाकी वर्दी परिधान करून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे बनावट सीबीआय अधिकारी कीर्ती सन्याल हिच्याशी संवाद घडवून आणला. कोर्टाची केस, अटक वॉरंट, मालमत्ता सील करणे आणि पोलिसांच्या गाडीची भीती दाखवून वृद्ध दाम्पत्याला मानसिक दबावाखाली आणत ‘डिजिटल ॲरेस्ट’ केले.
सोने तारण ठेवून घेतले कर्ज
कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी व ''आरबीआय''कडून रक्कम परत मिळण्याचे आमिष दाखवून ठकबाजांनी घुले यांच्याकडून १३ ऑक्टोबर २०२५ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण २३ लाख ४० हजार ०७० रुपये ट्रान्स्फर करून घेतले. घुले यांनी स्वतःच्या बचत खात्यातील रकमेसह एसबीआयमधून ७.५ लाख रुपयांचे गोल्ड लोन व ओव्हरड्राफ्ट क्लोज करून ही रक्कम भरली होती.
चौकट
वारंवार पैशांची मागणी
अनेक दिवस उलटूनही पैसे परत न मिळाल्याने व वारंवार आणखी पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे घुले यांच्या लक्षात आले. त्यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. सायबर पोलिस ठाण्यात घुले यांच्या तक्रारीवरुन दीपक शर्मा, कीर्ती सन्याल आणि रवी कुमार नावाच्या बनावट अधिकाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर तपास करीत आहेत.