धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती
--
निमगूळला चालकांचा
अनोखा सन्मान
धुळे : निमगूळ (ता. धुळे) येथे चालक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ट्रक, रिक्षा, ट्रॅक्टर व स्कूल बस चालकांचा ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. चालक हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. शेतमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे, विद्यार्थ्यांना शाळेत नेणे आणि रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे यात चालकांचे योगदान असते. ऊन, पाऊस, थंडी आणि वाहतूक कोंडीचा सामना करत कुटुंबापासून दूर राहून ते कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कष्टाचा आपण नेहमी आदर केला पाहिजे, असे म्हणत दिलीप खिवसरा यांनी मार्गदर्शन केले. चालक दिनानिमित्त सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. तुषार मोरे, राजेंद्र सोनवणे, बाळू सोनवणे, विजय मोरे, मोनू मोरे, मोनू राजपूत, लुभान राजपूत, मृणाल सोनवणे आणि वसंत मराठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
--
शिरुड येथे
आरोग्य शिबीर
धुळे : माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुड (ता. धुळे) येथे रविवारी (ता. २०) मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते होणार असून, माजी आमदार पाटील यांची विशेष उपस्थिती राहील. शिबिरात पोटाचे व आतडीचे विकार तज्ज्ञ डॉ. निशीगंध पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. देवयानी पाटील, किडनी विकारतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. वसीम कुरेशी, अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. हर्षल पाटील आणि जनरल फिजिशियन डॉ. अफजल शेख हे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या महाआरोग्य शिबिराचा सर्व गरजू नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.
--
काव्य सोनवणे
राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
धुळे : येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा प्रतिभावान बालखेळाडू काव्य मनोज सोनवणे याने राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश संपादन केले आहे. परभणी येथे झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने १० वर्षांखालील ‘सेबर’ प्रकारात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान जम्मू- काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत काव्य जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते, मुख्याध्यापिका वृषाली चौधरी आणि प्रशिक्षक विशाल राव यांनी त्याचे कौतुक केले आहे.
--
डॉ. आंबेडकर शाळेत
वक्तृत्व स्पर्धा
धुळे : देवपूरस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान अंतर्गत माझ्या स्वप्नातील भारत आणि विकसित भारत २०४७ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भारताच्या विकासाबाबत आपले विचार प्रभावीपणे मांडले. संविधानिक जबाबदारी म्हणूनच नव्हे तर नैतिक जबाबदारी म्हणूनही आपण देशसेवा केली पाहिजे, असे आवाहन पर्यवेक्षक प्रदीप इन्सुलकर मार्गदर्शन करताना सांगितले. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशाच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. डी. एस. पगार यांनी सूत्रसंचालन केले. एम. पी. वाघ यांनी आभार मानले.