नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या दुजाभावाने सिंहस्थाची प्रतिमा मलिन नको
ध्वजारोहणापूर्वी रामकुंड, कुशावर्त खुले करण्याची साधू-महंतांची मागणी; नियोजनात समन्वयाचा मंत्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात नाशिक व त्र्यंबकेश्वर असा दुजाभाव निर्माण होत असल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. प्रशासनाने आखाड्यांच्या साधू-महंतांना विश्वासात घेऊन नियोजन करावे. नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा एकच असल्याचा संदेश जगभर पोहोचवावा. तसेच ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणापूर्वी रामकुंड व कुशावर्त कुंड खुले करावेत, अशी मागणी साधू-महंतांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.
सिंहस्थ- कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात शनिवारी (ता. १९) ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी आखाडा परिषदेचे हरिगिरीजी महाराज, रामकिशोरदास महाराज, भक्तीचरणदास महाराज यांच्यासह महापौर हिमगौरी आडके, खासदार शोभा बच्छाव, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, आमदार गोकूळ गीते, दिलीप बनकर, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विविध अधिकारी व साधू-महंत उपस्थित होते.
देशभरात चार ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यातील नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याच्या नियोजनाचा संदर्भ घेऊन अन्य ठिकाणीही व्यवस्था उभारल्या गेल्या आहेत. मात्र, सध्याच्या नियोजनात नाशिक व त्र्यंबकेश्वर असा वाद निर्माण होत असल्याचे साधू-महंतांनी बैठकीत निदर्शनास आणले. या विसंवादामुळे सिंहस्थापूर्वीच नाशिकची प्रतिमा मलिन होत असल्याने प्रशासनाने समन्वयातून हे चित्र बदलावे, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर एक असल्याचा संदेश देतानाच उत्कृष्ट आयोजनातून जगभरात नाशिकची प्रतिमा उंचवावी, असेही त्यांनी सांगितले. ध्वजारोहणापूर्वी रामकुंड व कुशावर्त खुले करावेत, साधू-महंतांच्या स्नानाला प्राधान्य द्यावे, व्हीव्हीआयपी पद्धत थोपवू नये, नदीघाट व शाही मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत आणि सिंहस्थाची कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना करण्यात आल्या.
प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनाची माहिती दिली. रामकुंड, कुशावर्त व नील पर्वत परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदावरी आरती, दिव्यसंध्या, रोषणाई, दीपप्रज्वलन, कुंभगीत व शंखनाद यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत. संकेतस्थळाच्या माध्यमातून सिंहस्थाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामांना गती द्या
‘ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी सूक्ष्म नियोजनातून करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामांना गती द्यावी. तयारीत कोणत्याही प्रकारची शिथिलता राहू नये,’ असे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
प्रतिमेवरून वाद
बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणातर्फे भगवान त्र्यंबकराजाची प्रतिकृती सादर करण्यात आली. त्यावर महंत हरिगिरीजी यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी सिंहस्थाच्या लोगोबाबतही आखाड्यांना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत त्यांनी बैठकीतून निघून जाण्याचा इशारा दिला. मंत्री महाजन यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वरवर स्वतंत्र टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले.
साधू-महंतांच्या प्रमुख सूचना
- त्र्यंबकेश्वरमधील नवीन कुंड परिसरात आवश्यक सुविधा द्याव्यात.
- नवीन कुंडात साधू-महंतांच्या स्नानाची व्यवस्था करावी.
- ध्वजारोहणापूर्वी रामकुंड व कुशावर्त खुले करावे.
- भाविकांसाठी दोन हजार खोल्या उभाराव्यात.
- खोल्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आखाडे घेण्यास तयार आहेत.
- ध्वजारोहण सोहळ्यामुळे स्थानिकांना अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- रामकुंड-कुशावर्त परिसरात नव्याने खोदकाम करू नये.
- नदीघाट व शाही मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत.
- रस्ते व अन्य कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.