एन्कर
लोगो : यशवंतराव देवमामलेदार महाराज जन्मदिन विशेष
---
फोटो : H30084, H30085
सरकारी अधिकारी जेव्हा जनसेवेतून ‘देवमामलेदार’ होतात !
नाशिकच्या भूमीत यशवंतराव महाराजांच्या अनोख्या पाऊलखुणा
प्रशांत भरवीरकर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : सरकारी खुर्चीवर बसलेला अधिकारी आणि त्याच अधिकाऱ्याचे मंदिर... आजच्या काळात ही कल्पनाही वेगळी वाटावी. मात्र, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यात हे प्रत्यक्ष घडले. पद, अधिकार आणि सरकारी यंत्रणेच्या पलीकडे जाऊन माणसातील दुःख पाहणाऱ्या यशवंतराव महादेव भोसेकर यांना जनतेनेच ‘देवमामलेदार’ ही उपाधी दिली. आज, भाद्रपद शुद्ध दशमीला त्यांचा जन्मदिन साजरा होत असताना त्यांच्या जीवनातील जनसेवेचा हा अध्याय पुन्हा उजळतो.
१८१५, सप्टेंबर महिन्यात रोजी जन्मलेल्या यशवंतरावांनी शिक्षणानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कारकून म्हणून सरकारी सेवेला सुरुवात केली. पुढे खजिनदार, शिरस्तेदार, दप्तरदार अशी पदे पार करत ते मामलेदार झाले. ८ मे १८६९ रोजी ब्रिटिश काळात सटाणा येथे स्वतंत्र मामलेदार कचेरी सुरू झाल्यानंतर ते बागलाणचे पहिले मामलेदार म्हणून रुजू झाले. सटाण्यातील अवघ्या चार वर्षांच्या सेवाकाळाने मात्र त्यांच्या नावाला इतिहासात वेगळे स्थान मिळवून दिले. १८७०-७१च्या दुष्काळात बागलाणमध्ये उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली. जनतेची अवस्था पाहून यशवंतरावांनी गरजूंना धन-धान्याची मदत केल्याचे उल्लेख आढळतात. सरकारी खजिन्यातील रक्कम गरिबांसाठी वापरल्याचा आणि चौकशीतही खजिना पूर्ववत आढळल्याचा प्रसंग त्यांच्या चरित्रकथेत सांगितला जातो. याच प्रसंगानंतर जनतेच्या श्रद्धेतून ‘देवमामलेदार’ हे नाव रूढ झाल्याचे वर्णन केले जाते. त्यांच्या कार्याची आणखी एक बाजू म्हणजे माणसात देव पाहण्याची वृत्ती. गरीब, गरजू, साधू-संत आणि सामान्य माणूस यांच्याशी ते आपुलकीने वागत. पदाचा अधिकार स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी वापरणारा अधिकारी अशी त्यांची लोकमानसातील प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळे ‘मामलेदार’ हे केवळ शासकीय पद राहिले नाही; त्याला जनसेवेची ओळख मिळाली.
---
नाशिकशी जोडले नाते
यशवंतराव महाराजांचे अखेरचे नातेही नाशिकशीच जोडले गेले. १८८७ मध्ये त्यांच्या देहत्यागानंतर नाशिकच्या गोदाघाटावर अंत्यसंस्कार झाल्याचे उल्लेख आहेत. पुढे गोदावरीकाठी, रामतीर्थासमोरील परिसरात त्यांच्या स्मृतीचे समाधिस्थान उभे राहिले. आजही नाशिकच्या धार्मिक-सांस्कृतिक पटावर देवमामलेदारांचे हे स्थान श्रद्धेचे केंद्र आहे. अधिकाराच्या खुर्चीत बसूनही सामान्य माणसाच्या वेदनेशी नाते जोडणारा अधिकारी लोकांच्या स्मरणात ‘देव’ होतो, याचे नाशिक जिल्ह्यातील हे दुर्मीळ उदाहरण म्हणजे यशवंतराव देवमामलेदार होय.
---
पुण्यतिथीला यात्रोत्सवाची परंपरा
-येवल्यातून सरकारी सेवेला प्रारंभ : यशवंतरावांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कारकून म्हणून सेवेला सुरुवात केल्याचे उल्लेख आहेत.
-सटाणा : कर्मभूमी - १८६९ मध्ये स्वतंत्र मामलेदार कचेरी स्थापन झाल्यानंतर बागलाणचे पहिले मामलेदार म्हणून त्यांनी काम पाहिले.
-दुष्काळातील जनसेवा - १८७०-७१च्या दुष्काळात गरजू जनतेला धन-धान्याची मदत केल्याचे चरित्रात्मक उल्लेख आहेत.
-नाशिक : अखेरचा अध्याय - १८८७ मध्ये नाशिकच्या गोदावरीकाठी त्यांच्या देहत्यागाचा उल्लेख आढळतो; रामतीर्थासमोरील परिसर त्यांच्या स्मृतीशी जोडला गेला.
-आजही श्रद्धास्थान - सटाणा येथे त्यांच्या स्मरणार्थ मंदिर असून पुण्यतिथीला यात्रोत्सवाची परंपरा सुरू असल्याचे नोंदी सांगतात.
--- कोट
श्री यशवंतराव देवमामलेदारांच्या पाऊलखुणांनी जिल्हा पावन झाला आहे. त्यांचे नित्य उत्सव गोदाघाटावरील समाधी मंदिरात चालतात. वर्षभरातील उत्सव, नित्य पूजा तसेच उत्सव होतात. देवमामलेदार यांच्या पूजेतील शाळिग्राम या ठिकाणी आहे, त्याची नित्य पूजा होते.
- संतोष कुलकर्णी, विश्वस्त, यशवंतराव देवमामलेदार समाधी मंदिर