ॲंकर
---------
फोटो येणार आहे
जळगाव :
----------------------------
पुरातन नाणी, नोटा अन् दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन
-------
इतिहासप्रेमींसह विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : पुरातन व दुर्मीळ वस्तू, नाणी, नोटा व टपाल तिकिटांचा अनोखा संग्रह पाहण्याची संधी जळगावकरांना उपलब्ध झाली आहे. अ. मजीद जकेरिया बीबा परिवार व मेहरुण येथील इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुरातन व दुर्मीळ वस्तू, नाणी व नोटा’ या भव्य प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. १९) उद् घाटन झाले.
दरम्यान, हे प्रदर्शन सोमवार(ता.२१)पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत मेहरुण येथील इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात सुरु आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा. मारुती जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद् घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अरुण धांडे, हाजी कादर टिक्की, एजाज मलिक, जळगावचे उपमहापौर मनोज चौधरी, प्रा. सुरेश पांडे, दत्तात्रय चौधरी, जगतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सालार म्हणाले की, जुनी नाणी, नोटा व ऐतिहासिक वस्तू या केवळ संग्रहातील वस्तू नसून, आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे, सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे जीवंत दस्तऐवज आहेत. अशा प्रदर्शनांमुळे नव्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची जवळून ओळख होते व तो जतन करण्याची प्रेरणा मिळते.
नागरिकांना आवाहन
या प्रदर्शनात विविध कालखंडांतील दूर्मीळ व पुरातन नाणी, जुन्या नोटा, टपाल तिकिटे, विविध ऐतिहासिक वस्तू मांडण्यात आल्या आहेत. संग्रहकर्ता अ. मजीद जकेरिया बीबा यांच्या संग्रहातील या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना इतिहास व सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य विकार अहमद यांनी केले. जुबेर यांनी आभार मानले. इतिहास व संस्कृतीप्रेमी, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन दूर्मीळ वस्तूंचा संग्रह पाहावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.