फोटो : H29548
तबला वादनाने रंगली
मासिक संगीत सभा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान आयोजित ७४ वी मासिक संगीत सभा ‘स्वरसाधना’ तबला वादनाने रंगली. या सभेत युवा तबला वादक सिद्धिविनायक पैठणकर यांच्या बहारदार एकल तबला वादनाने उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
शालीमार येथील सारडा कन्या विद्यामंदिरात सभा पार पडली. या वेळी गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर, ज्येष्ठ तबला वादक नितीन वारे, श्रीकांत कुलकर्णी, सुधा वैरागकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सुरवातीला अथर्व संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राग केदार आणि तराणा यांचे श्रवणीय फ्युजन सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर पैठणकर यांनी एकल तबला वादनात तीनतालामध्ये बनारस घराण्याच्या परंपरेने भारदस्त उठाण सादर केली. लयकारीयुक्त पेशकार सादर करताना त्यांनी तबल्यावर अद्भुत किमया दाखवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुढे कायदा, रेला, गत, चक्रधार आणि परण या रचनांच्या नजाकतीने आणि तांत्रिक कौशल्याने मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली. पैठणकर यांनी लाहू महाराज ढोळे यांच्याकडून पखवाजची, तर पं. अरविंद कुमार आझाद यांच्याकडून तबल्याची तालीम घेतली. त्यांना संवादिनीवर अभिजित भाटजीरे यांनी साथसंगत केली. ओंकार वैरागकर यांनी आभार मानले.
-----------