ॲंकर
टुडे पान एकसाठी
--------------
(समर्पक छायाचित्र वापरावे)
---------
जळगावात देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा
--------
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे २८, २९ सप्टेंबरला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : विद्यार्थ्यांत देशभक्तीची भावना, राष्ट्रीय चारित्र्य व संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘गांधीतीर्थ जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा येत्या २८ व २९ सप्टेंबरला सकाळी दहापासून मायादेवीनगरातील रोटरी भवनात होणार आहे.
आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. त्याच्या मनात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजणे आवश्यक आहे. याच विचारातून गांधी रिसर्च फाउंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देत आहे.
शहरी, ग्रामीण गटांत स्पर्धा
स्पर्धेत शहरी व ग्रामीण अशा दोन गटांत शाळांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास सात हजार रुपये, द्वितीय क्रमांकास पाच हजार, तृतीय क्रमांकास तीन हजार व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी १,५०० रुपयांची देण्यात येणार आहेत. याशिवाय शहरी व ग्रामीण विभागांतील जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या संघाला ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
१४-१
असे आहेत नियम
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रत्येक संघात कमाल १२ विद्यार्थी असावेत. स्पर्धेसाठी मराठी किंवा हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करता येईल. चित्रपटातील गीतांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. गीत गायनासाठी कमाल पाच मिनिटांचा कालावधी राहील. संगीत शिक्षकांनी स्पर्धेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणे आवश्यक आहे. तबला, ढोलकी, ढोल, पखवाज, संबळ, ताशा, हार्मोनियम आदी पारंपरिक वाद्यांना परवानगी आहे. सादरीकरणाच्या गुणवत्तेनुसार परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
यांच्याशी करावा संपर्क
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी येत्या २६ सप्टेंबर २०२६ला सायंकाळी साडेपाचपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक गिरीश कुलकर्णी (९८२३३ ३४०८४) व सुधीर पाटील (९८२३३ ६२३३०) यांच्याशी संपर्क साधता येईल, असे आयोजकांनी कळविले आहे.