ॲंकर
----
NSK26H30128
जळगाव : पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्तीचे शासकीय निवासस्थानी विसर्जन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे व डॉ. मिहिका घुगे.
---------------
जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
------
पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेश मूर्तीचे शासकीय निवासस्थानी विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२० : श्रीगणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तो श्रद्धा, संस्कार व आपल्या पुढच्या पिढीकडे मूल्ये सुपूर्द करण्याचा सोहळा आहे. हीच भावना जपत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली होती. पाच दिवस भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चना करण्यात आली. पाचव्या दिवशी निरोपाची वेळ आली व वातावरण काहीसे भावूक झाले होते. जिल्हाधिकारी घुगे, त्यांच्या पत्नी डॉ. मिहिका घुगे, चिरंजीव रिधान घुगे यांनी पारंपरिक पद्धतीने श्रीगणरायाची पूजा व आरती केली. त्यानंतर पर्यावरणाचे भान जपत, कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतावर अतिरिक्त भार न टाकता आपल्या शासकीय निवासस्थानीच योग्यविहित पद्धतीने श्रीगणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.
या छोट्याशा कौटुंबिक कृतीमागे समाजासाठी एक मोठा संदेश दडलेला आहे.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश केवळ सूचना देऊन नव्हे, तर तो स्वतःच्या आचरणातूनही समाजापर्यंत पोहोचवता येतो. प्रशासकीय अधिकारी म्हणून नागरिकांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करतानाच स्वतःच्या घरापासून त्याची सुरुवात करणे, ही कृती समाजासमोर अनुकरणीय उदाहरण ठेवणारी ठरते. शासन व प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित असलेल्या सकारात्मक बदलाची सुरुवात स्वतःपासून केली, तर त्या संदेशाची परिणामकारकता अधिक वाढते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
विशेष म्हणजे हा पुढच्या पिढीपर्यंत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार पोहोचविण्याचा सुंदर क्षण ठरला. आज मुलांच्या मनात रुजविलेली निसर्गाबद्दलची संवेदनशीलता, जबाबदारी व पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव हीच उद्याच्या पर्यावरणस्नेही समाजाची पायाभरणी आहे. श्रद्धा व परंपरा जपत असतानाच निसर्गाचेही तितक्याच आत्मियतेने रक्षण करता येते. त्यासाठी मोठ्या उपक्रमांचीच आवश्यकता असते, असे नाही. शाडू मातीच्या मूर्तीची निवड, घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन व जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्याचा छोटासा प्रयत्नही मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. श्री गणरायाला निरोप देताना एका कुटुंबाने जपलेली ही पर्यावरणपूरक परंपरा समाजासाठी एक साधा, पण अर्थपूर्ण संदेश देऊन जाते.
-----
कोट
ज्या निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले, त्या निसर्गालाही जपूया. सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप दिला पाहिजे, तरच निसर्ग जपता येईल.
उत्सवाचा आनंदासोबत आपल्या परंपराही जपूया.
-रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव.