नवीन बसस्थानकावर
वृद्धाचे २१ हजार लुटले
-------
संशयित भुरट्या चोरटा अटकेत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२० : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका वृद्धाच्या हाताला झटका देत २१ हजार रुपयांची रोकड हिसकावून चोरटा पसार झाला होता. गुरुवारी (ता.१७) घडलेल्या या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, संशयित चोरट्याला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील असोदा येथील ६८वर्षीय वृद्ध मोहम्मद बाबू खाटीक हे गुरुवारी (ता.१७) दुपारी पावणेबाराला नवीन बसस्थानकावर बसच्या प्रतिक्षेत असताना त्यावेळी एक भुरटा चोर त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. अचानक त्यांच्या हाताला जोरात झटका देत हातातील २१ हजार रुपये बळजबरीने हिसकावून पळून गेला हेाता. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खाटीक यांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत गुन्हेशोध पथकाला संशयिताचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्यासह पथकाने संशयिताला ताब्यात घेत अटक केली. अटकेनंतर त्यास रविवारी (ता.२०) येथील न्यायलायात हजर करण्यात आले असून, कायदेशीर ओळखपरेडची प्रक्रिया बाकी असल्याने पोलिसांनी चोरट्याचे नाव अद्याप जाहीर केले नाही.