धुळे टुडे १ साठी मेन...
---
फोटो- NSK26H30129
चार दिवस मध्यरात्रीपर्यंत आवाज घुमणार
---
जिल्हाधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवात वेळेत सवलत; ध्वनीमर्यादेचे नियम कायम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’ असलेल्या श्री गणेशोत्सवात नागरिकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवसांसाठी ध्वनिक्षेपक (स्पीकर) वापरास रात्री बारापर्यंत सवलत दिली आहे. गणेशोत्सवातील पाचवा, सातवा, नववा दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही सवलत असेल.
गणेशोत्सवात मंडळांतर्फे विविध प्रबोधनात्मक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नोकरदार, विद्यार्थी व नागरिकांना या कार्यक्रमांत सहभागी होता यावे, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सवलत संपूर्ण उत्सव कालावधीसाठी नसून केवळ नमूद केलेल्या चार दिवसांसाठीच लागू राहील. उर्वरित दिवसांमध्ये नेहमीप्रमाणे रात्री दहापर्यंतचीच मर्यादा कायम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उल्लंघन केल्यास कारवाई
रात्री बारा वाजेपर्यंतची सवलत ही केवळ वेळेपुरती मर्यादित असून आवाजाच्या तीव्रतेत (डेसिबल) कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. ध्वनी प्रदूषण नियम २००० आणि न्यायालयीन निर्देशांनुसार निश्चित केलेल्या मर्यादांचे काटेकोर पालन करणे सर्व मंडळांना बंधनकारक राहील.
शांतता क्षेत्रांचे नियम कायम
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये व अधिसूचित शांतता क्षेत्रांमध्ये निर्बंध कायम राहतील. ध्वनिक्षेपक आणि साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी स्थानिक सक्षम प्राधिकरणाची (पोलिस/ प्रशासन) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
---
...चौकट...
ध्वनीमर्यादा अशी
निवासी क्षेत्र : दिवसा ५५ dB | रात्री ४५ dB
व्यावसायिक क्षेत्र : दिवसा ६५ dB | रात्री ५५ dB
औद्योगिक क्षेत्र : दिवसा ७५ dB | रात्री ७० dB
शांतता क्षेत्र : दिवसा ५० dB | रात्री ४० dB
---
फोटो- NSK26H30131
...कोट...
गणेशोत्सव उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक भान राखून साजरा करावा. तसेच पाचवा, सातवा, नववा दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवसांसाठी देण्यात आलेल्या विशेष सवलतीचा जबाबदारीने उपयोग करावा.
-भाग्यश्री विसपुते, जिल्हाधिकारी, धुळे
---