धुळे टुडे १ साठी सेकंड मेन...
---
फोटो-NSK26H30124
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते. शेजारी सीईओ बाबासाहेब बेलदार व इतर अधिकारी.
---
‘सेवा संकल्प’ केवळ कागदावर नको
---
जिल्हाधिकारी विसपुते; लाभ नागरिकांच्या दारी पोचावा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : सेवा संकल्प अभियान हे केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष नागरिककेंद्रित झाले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांना त्यांच्या दारी मिळवून देण्यास सर्व यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियान- २०२६ च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, कृषी अधीक्षक सुरज जगताप, नियोजन अधिकारी संतोष वानखेडे, कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, डॉ. गिरीष पाटील, चंद्रकांत दुसाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव भास्कर आदी उपस्थित होते.
एकाच छताखाली सेवा
तालुकास्तरावर सेवा सेतू व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करून प्रलंबित फेरफार, जिवंत सातबारा, वन हक्क दावे, शिधापत्रिका, दाखले, वीज व नळ जोडणी, आधार कार्ड, परवाने यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अभियान यशस्वी करा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी सांगितले, की अभियानाची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपातळीपर्यंत करण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी सक्रिय व्हावे. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तर शहरी भागात मुख्याधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. गावागावांत स्वच्छता, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, रक्तदान व डिजिटल साक्षरता यांसारखे उपक्रम लोकसहभागातून राबवले जातील.
महत्त्वाचे उपक्रम
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेले निर्देश असे : प्रलंबित वन हक्क दावे निकाली काढून अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यासाठी विशेष वेळापत्रक आखावे. जिल्ह्यात येणाऱ्या या यात्रेचे स्वागत, संवाद कार्यक्रम व एलईडी स्क्रीनद्वारे माहितीपटांचे प्रदर्शन यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या बदलांच्या बदलाची गोष्ट व आशीर्वादाचा दिवा या उपक्रमांतर्गत यशोगाथा, व्हिडिओ व रिल्स तयार कराव्यात. विकसित भारत-२०४७ वर आधारित चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि ‘नमो सेवागाथा’ कलापथक कार्यक्रमांचे दोन ऑक्टोबरला आयोजन करावे.
---