पती-पत्नीच्या भांडणात
मध्यस्थी पडली महागात
------
मध्यस्थावर लोखंडी सांडशीने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यावरच संशयिताने लोखंडी सांडशीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील खेडी येथील शिवरामनगरात घडली. जखमीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडी शिवारातील रहिवासी साहेबराव यशवंत हिवरे (वय ५५) हे शुक्रवारी (ता.१८) रात्री साडेअकराच्या सुमारास घरी असताना त्याचे शेजारी पती-पत्नीचे भांडण सुरू होते. योगेश कृष्णा सुरवाडे (मूळ रा. घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ, भुसावळ, हल्ली रा. वसई-विरार, मुंबई) हा दारूच्या नशेत त्याची पत्नी पूनम हिला जबर मारहाण करीत होता. म्हणून भांडण सोडविण्यासाठी साहेबराव हिवरे यांचा मुलगा मच्छिंद्र, पत्नी मंगला हिवरे व सून रजनी यांनी त्याच्या तावडीतून पत्नीला सोडविण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याचा राग आल्याने योगेश सुरवाडे याने त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत लोखंडी सांडशीने साहेबराव हिवरे यांच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या भुवईजवळ जोरात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित योगेश सुरवाडेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.