सूचना : ही बातमी दोन कॉलम आवर्जून घ्यावी
==============================
विवाहित असताना दुसरे लग्न;
पहिल्या पत्नीला तीन तलाक
--------
पतीसह आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२० : प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ करीत तिला मारहाण करून पतीने एकाचवेळी तीन वेळा तलाक दिल्याची घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात पतीसह आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कानळदा रोडवरील सिटी कॉलनी लक्ष्मीनगरातील रहिवासी फरजाना बी शरीफ शेख मणियार (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे पती व सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू होता. माहेरून अडीच लाख रुपये आणावे, यासाठी सासरच्या मंडळींनी फरजानाबी यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण केली. पती शरीफ हारूण मणियार याने बेदम मारहाण केली व एकाच वेळी मोठ्याने ''तलाक, तलाक, तलाक'' उच्चारून बेकायदेशीरपणे तोंडी तलाक दिला. याशिवाय, पहिले लग्न कायम असताना व तक्रारदार पत्नीची कोणतीही संमती नसताना पती शरीफ याने अर्शिया समशेरखान या दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी फरजानाबी यांच्या तक्रारीवरून पती शरीफ हारूण मणियार, सासरे हारूण, दीर आरिफ, नणंद अमीन, अफसाना रईस, नणंदोई नाजम शेख, रशीद शेख कलीम व दुसरी पत्नी अर्शिया समशेरखान अशा एकूण आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक प्रकाश वाघ करीत आहेत.