धुळे टुडे १ साठी...
---
फोटो-NSK26H30136
धुळे : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्यात लाभार्थी महिलेला कर्ज मंजूरीचे पत्र देतांना निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार. शेजारी इतर अधिकारी.
---
विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिरांपर्यंत पोहोचवा
---
निवासी उपजिल्हाधिकारी पवार; मेळाव्यात टूलकिट व कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पारंपरिक कारागीर व गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा झाला. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मयूर ठेले, एसबीआयचे शाखाप्रमुख नितेश परदेशी, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक प्रकाश घुगे, एमआयडीसी एरिया मॅनेजर पी. एस. साळुंखे, उद्योग पर्यवेक्षक योगेश भदाणे व लेखापरीक्षक पंकज विसपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट आणि कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पवार म्हणाले, की सेवा संकल्प अभियानामुळे शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. १८ प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांचा समावेश असलेल्या या योजनेत प्रशिक्षण, १५ हजार रुपयांचे टूलकिट साहाय्य आणि कर्जाच्या माध्यमातून कारागिरांना स्वतःचा व्यवसाय विकसित करता येईल. बँकांनी कर्जप्रकरणांतील त्रुटी तातडीने दूर करून मंजुरी प्रक्रियेला गती द्यावी.
८६ हजार कारागिरांची नोंदणी
या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून कारागीर सक्षम उद्योजक बनतील असा विश्वास ‘यशदा’चे तज्ज्ञ मार्गदर्शक उमाकांत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला. प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ४२० कारागिरांची नोंदणी झाली आहे. यातील एक हजार ३१७ लाभार्थ्यांना टूलकिट वाटप केले. तर ४७७ कारागिरांना पहिल्या टप्प्यातील एक लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. तसेच, प्रशिक्षण कालावधीत प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जात आहे. उद्योग पर्यवेक्षक योगेश भदाणे यांनी प्रास्ताविक केले तर लेखापरीक्षक पंकज विसपुते यांनी आभार मानले.
---