मेन (दोन्ही मेन क्लब करणे)
फोटो : H30144
सेवकांचे वेतन वाढल्याचे त्यांना वाईट वाटते
ॲड. नितीन ठाकरे : रुग्णसंख्या वाढीसाठी त्यांनी उपाय सुचवावे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : आपल्या कार्यकाळात विनाअनुदानित सेवकांना घसघशीत वेतनवाढ दिली आहे. सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची जबाबदारी आमच्या कार्यकारिणीची आहे. याबाबत विरोधकांनी चिंता करू नये. सेवकांचे वेतन वाढल्याचे त्यांना का वाईट वाटते, अशी टीका मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सभेनंतरच्या पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक डॉ. संदीप गुळवे, डॉ. सयाजी गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ॲड. ठाकरे म्हणाले, की वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण संख्या घटलेली नाही. तथापि विरोधकांना असे वाटत असेल, तर त्यांनी उपाय सूचवावे. अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले स्वतः डॉक्टर असून, त्यांच्यासह इतरांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. संस्थेत विविध राजकीय विचारांचे व्यक्ती एकत्रितपणे काम करतात. त्यामुळे अहवालात कधीच कुठल्या राजकीय व्यक्तीचे छायाचित्र यापूर्वीदेखील छापलेले नाहीत. तीच शिस्त आम्हीदेखील पाळली. विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. आजच्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते. त्यामुळे कुणाला बोलू द्यायचे, कुणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही बोलण्यासाठी कुणालाही अडविले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सभासद पावतीसंदर्भातील आरोपाविषयी ते म्हणाले, की २०१९ मध्ये घटनादुरुस्ती झालेले असतांना, आपल्या यापूर्वीच्या कार्यकारिणीने त्यांच्या कार्यकाळात वारसा सभासदांना पावती देणे अपेक्षित होते. तेव्हा त्यांनी पावती का दिली नाही, याचे उत्तर द्यावे.
---चौकट
प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कटिबद्ध
आमच्या कार्यकारिणीने आवश्यकतेनुसार जमीन खरेदी केली व या जमिनीची निवड करताना रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा विचार केला. याउलट यापूर्वीच्या कार्यकारिणीने रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधा नसलेल्या जमिनींची खरेदी केल्याचा दावा ॲड. ठाकरे यांनी केला. हिशोबातील संशयावर उत्तर देताना ते म्हणाले, की सभा झाली असली तरी आपण प्रत्येक शंकेला उत्तर देण्यासाठी बांधील आहोत. प्रत्येक सभासदाला हिशोबाचा तपशील पाहण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध आहे. उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ॲड. ठाकरे म्हणाले.