किरकोळ वादातून तरुणाचे नाकच कापले
---
कुसुंबा येथील घटना; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : विवाहितेशी बोलणे अचानक बंद झाल्याने तिच्या पतीशी वाद घालून दोघांनी कटरपट्टी व कात्रीने हल्ला चढविला. यात पट्टीने दोन-तीन वार करून कात्रीने तरुणाच्या नाकाचा शेंडाच कापून टाकला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ शाळेमागे कांचन व भूषण पाटील वास्तव्यास आहेत. त्यांच्याच घराजवळील स्वप्नील राजेंद्र पाटील (वय २३) याच्याशी कांचन पाटील सहज बोलत होत्या. मात्र, पतीने समज दिल्यानंतर अचानक बोलणे बंद केल्याने स्वप्नील पाटीलचे पित्त खवळले. शनिवारी (ता. १९) दुपारी अडीचच्या सुमारास कांचन पाटील व त्यांचे पती भूषण लक्ष्मण पाटील (वय ३६) घरी असताना, संशयित स्वप्नील पाटील व धीरज संतोष खंडाळकर (वय २३) त्यांच्या घरी आले. दोघांनी शिवीगाळ करीत विवाहितेच्या पतीवर धारदार पट्टीने व कात्रीने हल्ला चढवला. मानेवर, नाकावर व काखेत वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरास त्याचा मित्र धीरज खंडाळकर याने चिथावणी देत भूषणला संपवून टाकण्यासाठी हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
दोघांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर गंभीर जखमी भूषण पाटील यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याबाबत कांचन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित स्वप्नील पाटील व धीरज खंडाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक बबन अव्हाड यांनी प्रकरणाची चौकशी केली, तर उपनिरीक्षक राजश्री पाटील तपास करीत आहेत.