H30173
सहसंचालकांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी व्हावी
प्रा. डॉ. पाटील : दाभोळकर विवेक व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २०ः प्राध्यापक भरती ही व्यवस्थापन, सरकारी बाबू यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सहसंचालकांकडे प्रत्येकी पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता असून, त्यांची चौकशी होण्याची अपेक्षा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.लालचंद पाटील यांनी व्यक्त केली.
शालिमार येथील सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ''प्राध्यापक भरतीचा काळाबाजार : गुणवत्तेच्या हत्येविरुद्ध आवाज'' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मुकुंद दीक्षित व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.पाटील म्हणाले, की या वर्षी ११ फेब्रुवारीला प्राध्यापक भरतीसंदर्भात शासन निर्णय पारीत केलेला असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कृपाशीर्वादाने सहसंचालकाने कोल्हापुरात १७ फेब्रुवारीला नियमावली डावलून भरती प्रक्रिया राबविली. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) च्या दिशानिर्देशांना हरताळ फासत वर्षानुवर्षे व्यवस्थापनाकडून गुणवत्तेला डावलून केवळ अर्थकारणातून भरती केली गेली. यासंदर्भात दिलेल्या न्यायालयीन लढ्याचा लेखाजोखा त्यांनी व्याख्यानातून मांडला. प्राध्यापक निवडीसाठी संशोधन, शैक्षणिक कामगिरी आदींचे आकलन करणे, तसेच ते कार्यरत असलेल्या क्षेत्रातील ज्ञान, अध्ययन कौशल्ये या घटकांना अधिक महत्त्व देणे अपेक्षित होते. मुलाखतीतील मूल्यांकन अवघे २० टक्के असताना हे दिशानिर्देश डावलून केवळ मुलाखतीची कामगिरी ग्राह्य धरताना नियमबाह्य पद्धतीने प्राध्यापक भरती केली गेल्याचा आरोप त्यांनी केला. इतर राज्यांमधील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया आणि राज्यातील प्रक्रिया यांची तुलना त्यांनी मांडली. गुजराथसह इतर राज्यांमध्ये गुणवत्तेच्या आधारे भरती होत असल्याचे सांगत केवळ बाबूशाहीच्या भ्रष्टाचारामुळे राज्यात पालन झाले नसल्याचे प्रा. डॉ. पाटील यांनी सांगितले.