NSK26H30198
जळगाव : महावितरणतर्फे विद्यालयात विद्यार्थ्यांचे ऊर्जा प्रबोधन करताना महावितरणचे अधिकारी.
---
‘महावितरण’कडून ऊर्जा साक्षरतेचा जागर
गणेशोत्सवात अभियंत्यांकडून शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘ऊर्जा प्रबोधन मोहीम’ राबविण्यात येत आहे. हरित ऊर्जेचा वापर, वीज बचत आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी महावितरणचे अभियंते शाळा, महाविद्यालये तसेच गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधत आहेत.
‘हरित ऊर्जा आणि विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल’ हा संदेश घेऊन सुरू असलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील वीज बचतीच्या उपायांची माहिती दिली जात आहे. गरज नसताना दिवे-पंखे बंद ठेवणे, एलईडी दिव्यांचा वापर करणे तसेच अधिक ऊर्जा कार्यक्षम उपकरणांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सौर व पवन ऊर्जेच्या वापराचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात आहे.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, ‘स्मार्ट’ छतावरील सौर योजना, ई-वाहन धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि ‘गो ग्रीन’ यांसारख्या योजनांची माहितीही देण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, अभियंते व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
.......