ॲंकर
NSK26H30207 : सिनेकलावंत अनिल मोरे
---
नाटकाने कधीच उपाशी मरू दिले नाही
जळगावचे अनिल मोरे ३५ वर्षांच्या रंगप्रवासानंतर रुपेरी पडद्यावर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२१ : लहानपणी दूरदर्शनवर मालिका पाहिल्यानंतर त्यातील प्रसंगांचा खेळ घरात खेळणारा मुलगा पुढे रंगभूमीवर तब्बल ३५ वर्षे एकांकिका आणि नाटकांमध्ये रमला. आयुष्यातील अनेक वर्षे संघर्षाची गेली. कधी घरात स्वयंपाकासाठीही पैसे नव्हते; मात्र अभिनयाची जिद्द आणि नाटकावरील प्रेम त्यांनी कधी सोडले नाही. याच जिद्दीच्या बळावर आता सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. अभिनेता अनिल मोरे यांचा हा रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कनाशी (ता. भडगाव) हे मूळ गाव असलेल्या अनिल मोरे यांचे बालपण वडिलांच्या नोकरीमुळे विविध ठिकाणी गेले. वडील महावितरणमध्ये असल्याने त्यांच्या बदल्या होत असत. मात्र ठिकाण बदलले तरी अभिनयाची आवड कायम राहिली. शालेय जीवनापासूनच नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात झाली. सातवीत असतानाच अभिनयाची गोडी लागली. नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी नाट्यवेड अधिक जोपासले. ‘नूतन नाट्य मंडळा’ची सुरुवात करून विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला. एकांकिका, नाटके अशा विविध माध्यमांतून अभिनयाची भूक भागवत राहिले.
कठीण संघर्ष
लग्न झाले त्यावेळी कुटुंबाची अवस्था बिकट होती. आयुष्यातील आठ-दहा वर्षे कठीण गेली. परिस्थिती इतकी बिकट होती की, घरात स्वयंपाक करण्यासाठीही पैसे नसत. तरीही त्यांनी रंगभूमीची साथ सोडली नाही. उलट, ‘नाटकाने मला कधीच उपाशी मरू दिले नाही,’ असे ते सांगतात. आत्मपाम्पलेट, वाळवी, येरे येरे पावसा, राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार प्राप्त सिनेमात तसेच मानवत मर्डर या वेब सिरीजमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
वेब सीरिजपर्यंत...
अनिल मोरे यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात ‘ओ तुनी माय’ या खानदेशी भाषेतील चित्रपटातून झाली. त्यानंतर ‘मोल’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या कामामुळे त्यांचा परिचय अनेक कास्टिंग डायरेक्टरशी झाला. पुढे ‘बाई तुझ्या पायी’ या वेबसीरिजमुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत त्यांची ओळख पोहोचली.
‘मंजुळा’तील भूमिका
मंजुळा सिनेमासाठी कास्टिंग डायरेक्टरने त्यांना चखण्याचा एक प्रसंग करून दाखविण्यास सांगितले. त्यांनी तो प्रसंग सादर केला आणि तो टीमला आवडला. विशेष म्हणजे, या भूमिकेला संवाद नव्हता. संवाद नसतानाही केवळ हावभाव आणि अभिनयातून व्यक्तिरेखेचा जीवंतपणा निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. व्यक्तिरेखा समजून घेऊन ती पडद्यावर नैसर्गिक पद्धतीने साकारण्यावर त्यांचा भर राहिला.
चौकट
कुटुंबाची साथ मोलाची
अभिनयाच्या या प्रदीर्घ प्रवासात पत्नीचे विशेष सहकार्य मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. अभिनयाची आवड असलेल्या पत्नीने प्रत्येक टप्प्यावर त्यांना प्रोत्साहन दिले. भाऊ, आई आणि बहीणींचाही मोठा आधार मिळाला. आर्थिक अडचणी आणि संघर्षाच्या काळात कुटुंबाने दिलेली साथच आपल्याला टिकवून ठेवणारी ठरल्याचे मोरे सांगतात.