NSK26H30226
मुंबई : ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना आमंत्रण देताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, व्हाइस चेअरमन अमोल पाटील.
----------
अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे
आक्टोबरमध्ये लोकार्पण
चेअरमन पवार यांनी दिले शरद पवारांना निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात माजी उपमुख्यमंत्री (कै.) अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ऑक्टोबरच्या दुसऱ्या सप्ताहात अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार, व्हाइस चेअरमन, आमदार अमोल पाटील यांनी सोमवारी (ता. २१) मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेत कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध विषयांवर श्री. पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. विशेषतः बँकेचा एनपीए, बँकेची आर्थिक परिस्थिती, आर्थिक व्यवहार, शेतकरी व सभासद आदी बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाबाबतही चर्चा झाली.
श्री. पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील शेती व पिकांची सद्यस्थिती, शेतकऱ्यांसमोरील अडचणी, तसेच जिल्ह्यातील एकूण परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्याचा सहकार क्षेत्रावर होणारा परिणामाबाबतही त्यांनी आस्थेने विचारणा केली.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात (कै.)अ जित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याच्या प्रस्तावित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकार, कृषी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी चेअरमन पवार मंगळवारी (ता. २२) जाणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले.