शिक्षक कृतज्ञता निधीतून ८७ लाखांची मदत!
--
धुळे जिल्हा परिषद शिक्षकांचा माणुसकी अन् एकतेचा आदर्शवत उपक्रम
धनंजय सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ ः शिक्षक समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविताना आयुष्य शिक्षणसेवेसाठी देणाऱ्या शिक्षकाच्या कुटुंबावर अनपेक्षित दुःखाचा डोंगर कोसळला, तर त्या कुटुंबाला मानसिक आधारासोबत तातडीच्या आर्थिक मदतीचीही गरज भासते. अशा कठीण प्रसंगी ‘आपण एकटे नाही’ हा दृढ विश्वास देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारलेला शिक्षक कृतज्ञता निधी उपक्रम माणुसकी आणि शिक्षक एकतेचे आदर्श उदाहरण ठरत आहे. या उपक्रमातून आतापर्यंत ४५ मृत शिक्षकांच्या वारसांना तब्बल ८७ लाखांची मदत करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याचा हा उपक्रम राज्यासाठी अनुकरणीय ठरत आहे.
शिक्षकांनी शिक्षकांसाठी, कोणत्याही पदाचा किंवा प्रतिष्ठेचा विचार न करता स्वेच्छेने उभारलेल्या या उपक्रमाची संकल्पना २ ऑक्टोबर २०२० ला पुढे आली. नंतर १ नोव्हेंबर २०२० पासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. संकटाच्या काळात सहकाऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार मिळावा आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यांतील सेवाभावी शिक्षक व स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ योगदानामुळे हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे.
दुसऱ्याच दिवशी मदत
प्रत्येक टप्प्याचा निधी भरल्यानंतर शिक्षकाने ऑनलाइन प्रणालीद्वारे आपल्या वारसाची माहिती नोंदवणे अपेक्षित असते. दुर्दैवाने सभासद शिक्षकाचे निधन झाल्यास दुसऱ्याच दिवशी संबंधित वारसाला मदत दिली जाते. मदत देताना वाच्यता, फोटो, व्हिडिओ किंवा चित्रीकरण न करता कुटुंबाच्या भावनांचा आदर राखून मदत पोहोचविली जाते.
८७ लाखांचा आधार
या उपक्रमात पहिल्या टप्प्यात एक हजार ९६ शिक्षक सभासद झाले असून, यात आठ मृत शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाप्रमाणे आठ लाखांची मदत करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सभासद संख्या दोन हजार ३५० वर पोहोचली असून, नऊ मृत शिक्षकांच्या वारसांना २० लाखांची मदत देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात एक हजार ९३७ शिक्षक सहभागी झाले असून, १७ मृत शिक्षकांच्या वारसांना ३५ लाखांचा आधार देण्यात आला. चौथ्या टप्प्यात दोन हजार २६ शिक्षक सभासद झाले असून, ११ मृत शिक्षकांच्या वारसांना २४ लाख रुपये मदत वितरित करण्यात आली. या चारही टप्प्यांत मिळून ४५ मृत शिक्षकांच्या वारसांना ८७ लाख रुपयांचा आर्थिक आधार मिळाला आहे.
चौकट
पारदर्शक कारभारावर भर
या निधीतील एकही रुपया अनावश्यक खर्च, कार्यक्रमावर खर्च केला जात नाही. दर तिमाहीला ऑनलाइन बैठकीत सर्व सभासदांसमोर हिशेब सादर केला जातो. चार टप्प्यांच्या यशस्वीतेनंतर आता पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात एक हजार २०० रुपये भरून शिक्षकांना सहभागी होता येईल. यात ‘जीपीएफ’धारकांसाठी जमा निधीच्या दहा टक्के (कमाल दोन लाख रुपये) आणि डीसीपीएस/एनपीएसधारकांसाठी १५ टक्के (कमाल तीन लाख रुपये) मदतीची तरतूद आहे.