30158
सरदार चौक मित्रमंडळाचा बालाजी मंदिराचा देखावा.
---
गणेशोत्सवात देशभरातील प्रसिद्ध मंदिरांचे नाशिकमध्ये दर्शन
रस्त्या-रस्त्यावर भाविकांचे जथ्थे; धार्मिक स्थळे आणि पौराणिक प्रसंगांची झलक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : रात्रीची वेळ... रस्त्यांवर वाढलेली वाहनांची गर्दी... चौकाचौकांत लखलखणारी विद्युत रोषणाई आणि त्यात गणरायाच्या दर्शनासाठी कुटुंबांसह बाहेर पडलेले हजारो नाशिककर! कोठे अयोध्येचे श्रीराम मंदिर, कोठे जगन्नाथपुरीचे मंदिर, तर कुठे स्वर्णगिरी मंदिराची भव्य प्रतिकृती... देखाव्यांसमोर गर्दी, मोबाइलमध्ये छायाचित्रे टिपण्याची लगबग आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा, असे चित्र शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि मंदिरांच्या दर्शनाचा अनुभव देणारा उत्सव ठरत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या देखाव्यांमध्ये गणेश मंडळांनी देशभरातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती साकारण्याबरोबरच समुद्रमंथन, अमृतकुंभ, रामायण, श्रीकृष्ण, वारकरी परंपररा संबंधित विषयही मांडले आहेत.
---
इंदिरानगरला जगन्नाथपुरी : इंदिरानगर उत्सव समिती गणेश मित्रमंडळाने जगन्नाथपुरी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींसह मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना उभारण्यात आली आहे. जगन्नाथांच्या जन्मापासूनची माहितीही देखाव्यातून मांडण्यात आली असून, बंगालमधील सुमारे २० ते २५ कारागिरांनी सलग १५ दिवस काम केले.
---
जुने सिडकोतील अयोध्या : श्री राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची सुमारे ५० फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. ‘उत्सव... परंपरेचा, संस्कृतीचा... कुंभमेळा अन् गणेशोत्सवाचा!’ या संकल्पनेतून देखावा उभारण्यात आला आहे.
---
इंदिरानगरमधील स्वर्णगिरी : वडाळा-पाथर्डी रोडवरील श्री प्रतिष्ठान गणेश मंडळाने तेलंगणातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या प्रसिद्ध स्वर्णगिरी मंदिराची पर्यावरणपूरक प्रतिकृती उभारली आहे.
---
भद्रकालीतील विठ्ठल मंदिर : धान्य बाजार परिसरात थ्रीडी इफेक्टमध्ये विठ्ठल मंदिराचा देखावा साकारण्यात आला असून, विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि पौराणिक मंदिरांचे थ्रीडी कट-आऊट्सही लक्ष वेधून घेत आहेत.
---
यश लॉन्स परिसरातील महाकुंभ : गणाधीश फाउंडेशनने नाशिक महाकुंभाची संकल्पना साकारली आहे. गणेशदर्शनासोबत सिंहस्थाच्या धार्मिक-सांस्कृतिक वातावरणाची अनुभूती देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.
---
अमृतकुंभापासून कृष्णलीलेपर्यंत
विद्या विकास सर्कल परिसरातील जय कालिका मित्र मंडळाने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर समुद्रमंथन आणि अमृतकुंभाचा चलत देखावा साकारला आहे. जुना गंगापूर नाका परिसरातील श्री मित्र मंडळाचा अमृतकुंभ देखावा यंदा ४८ व्या वर्षात आहे. बॉश गणेशोत्सव मंडळानेही बी. डी. भालेकर मैदान परिसरात समुद्रमंथनाचा देखावा साकारला आहे. अशोक स्तंभ गणेशोत्सव मित्र मंडळाचा कृष्ण रासलीला देखावा, रविवार पेठेतील देवधर लेन युथ सेवा फाउंडेशनची द्वारकाधीश गणेशमूर्तीची आरास, श्रीकृष्णनगर मित्र मंडळाचा ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ हा वारकरी देखावा भाविकांचे लक्ष वेधत आहे.
सोमवार पेठेतील वेलकम सहकार्य मित्र मंडळाने रामायणातील प्रसंगांवर आधारित जिवंत देखावा साकारला आहे. युवा पिढीला मार्गदर्शन देणारे प्रसंग त्यातून मांडले आहेत. मंडळाचे हे ८४ वे वर्ष आहे. यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळातर्फे दररोज वेगवेगळे जिवंत देखावे सादर केले जात आहेत.
---
रामायणापासून हनुमानाच्या विराट रूपापर्यंत
राणेनगर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अश्वमेध यज्ञ, लव-कुश यांचा पराक्रम आणि भक्तीभावाने हनुमानाने साकारलेले विराट रूप देखाव्यात मांडले आहे. येथे १८ फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे.
---
गणेशमूर्तीही आकर्षणाचा केंद्रबिंदू
माऊली लॉन्स परिसरातील माऊली मित्र मंडळाने बालाजी रूपातील गणेशमूर्ती साकारली असून, मूर्तीची उंची १२ फूट आहे. जगदंब प्रतिष्ठान, आनंदनगर-कामटवाडे परिसरात श्रीकृष्ण मंदिराचा देखावा असून, येथे १३ फूट फायबर गणेशमूर्ती आहे. इंद्रकुंड परिसरातील श्री इंद्रकुंड युवक मित्र मंडळाने जास्वंदीच्या फुलावर विराजमान १८ फूट गणेशमूर्ती साकारली असून, मंडळाचे हे पहिले वर्ष आहे. भद्रकालीतील नटराज बंधू मित्र मंडळाची १४ फूट सिंदूरवदना गणेशमूर्तीही लक्षवेधी ठरत आहे. हिंद माता सेवक मंडळाने तिवंधा चौकात गजानन महाराजांचा विषय मांडला आहे. सर्वज्ञ फाउंडेशनचा स्वामी समर्थ प्रकट देखावा, शाहीद सर्कल परिसरातील शिवप्रिय प्रतिष्ठानची आरास आणि जुनी तांबट लेन कॉर्नरवरील भारत मित्र मंडळाची आकर्षक विद्युत रोषणाईही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
---
५१ फूट शिवलिंग आणि योगी मच्छिंद्रनाथ
इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मीडिया असोसिएशनतर्फे ५१ फूट उंच शिवलिंगाचे दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्रमिक सेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बी. डी. भालेकर मैदान परिसरात योगी मच्छिंद्रनाथ जन्माचा पौराणिक देखावा साकारण्यात आला आहे.
---
रात्री शहरात ‘गणेशदर्शनाची सफर’
संध्याकाळनंतर शहरातील गणेश मंडळांच्या परिसरात गर्दीचा ओघ वाढत आहे. कुटुंबे, तरुणांचे ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिक देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत फिरताना दिसत आहेत. एका मंडळात गणेशदर्शन, दुसऱ्या मंडळात मंदिराची प्रतिकृती, तर पुढे पौराणिक देखावा, अशी ‘गणेशदर्शनासोबत धार्मिक स्थळांची सफर’ नाशिककरांना यंदाच्या उत्सवात अनुभवता येत आहे.