जिल्ह्यात २९ ला ‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन
मंगेश वाघ : सहा तालुक्यात ९ ठिकाणी होणार मेळावे
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २२ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे जिल्ह्यातील युवक- युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी (ता. २९) रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी दिली.
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव) आणि नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये मिळून एकूण ९ ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार आहे. या रोजगार महाकुंभाचा मुख्य उद्देश अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधर, पदविकाधारक (डप्लोमा), आयटीआय उत्तीर्ण तसेच अनुभवी बेरोजगार युवक- युवतींना नामांकित कंपन्या आणि उद्योगांमध्ये थेट रोजगाराची संधी मिळणार आहे. या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजक, कंपन्या व आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------
तालुकानिहाय मेळावे
नंदुरबार तालुका : गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार, जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग, वाघोदे. नंदुरबार
शहादा तालुका : शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी विकास मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, शहादा, पूज्य साने गुरुजी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणखेडा.
अक्कलकुवा तालुका : संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ संचलित श्री बापूसाहेब व्ही. सी. चौधरी महाविद्यालय, खापर, कालिकामाता मंदिर ट्रस्ट, अक्कलकुवा.
तळोदा तालुका : अध्यापक शिक्षक मंडळ सी. एस. चौधरी आर्ट्स, एस. जी. पटेल कॉमर्स ॲन्ड बाबाजी बी. जे. पटेल सायन्स कॉलेज, तळोदा.
अक्राणी तालुका : आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य आणि वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय. अक्राणी.
नवापूर तालुका : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर.