लोकशाही दिनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप
चाळीसगावला शासन आदेशानुसार कार्यवाही न झाल्याची तक्रार
सकाल वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २१ : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, येथे सोमवारी (ता. २१) झालेल्या लोकशाही दिनाच्या कार्यपद्धतीवर काही तक्रारदारांनी आक्षेप घेतले आहेत. अध्यक्षपद, लोकशाही दिनाची वेळ तसेच तक्रारदारांना आपली बाजू मांडण्याची संधी याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही झाली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, शासन निर्णयानुसार जे अभिप्रेत आहे, त्या पद्धतीने लोकशाही दिनाचा कार्यक्रम झाल्याचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी सांगून तक्रारदारांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.
विविध शासकीय कार्यालयांकडे केलेल्या तक्रारींचे निराकरण न झाल्यास लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. चाळीसगाव तालुक्यातील मागील काही लोकशाही दिनांच्या कार्यपद्धतीबाबत मात्र प्रश्न उपस्थित झाले आहेत. येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय अस्तित्वात असताना लोकशाही दिनाचे अध्यक्षपद तहसीलदारांकडे कसे? असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. काही प्रकरणांत संबंधित अधिकारी ‘आपल्या अधिकारात येत नाही’ असे सांगून प्रकरणे प्रलंबित ठेवत असल्याचा आरोपही तक्रारदार गणेश अग्रवाल व इतरांनी केला आहे.
प्रवेशाचा नियम कोणता?
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अनेक तक्रारदार उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांसमोर आपापल्या तक्रारी मांडतात. चाळीसगाव येथे मात्र एकाच वेळी केवळ एकाच तक्रारदाराला दालनात प्रवेश देण्याची पद्धत कोणत्या शासन आदेशानुसार लागू करण्यात आली, असा सवाल तक्रारदार गणेश अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. शिवाय लोकशाही दिनाची वेळ सकाळी दहाची असताना अकरा वाजेची वेळ संंबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमाने केली? असाही प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. शासन आदेशानुसार लोकशाही दिनाची कार्यपद्धती राबवण्याची मागणी तक्रारदार गणेश अग्रवाल यांनी केली आहे. यावेळी रवींद्र कोष्टी, पवन असलेकर, सागर नागणे, संदीप लांडगे, आबासाहेब सोनवणे, समाधान पाटील, योगेश शिनकर आदी उपस्थित होते.
--------------------------
शासन निर्णयानुसारच झाले कामकाज ः प्रांताधिकारी हिले
या संदर्भात प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितले, की वैयक्तिक तक्रारीला सामूहिक स्वरुप येऊ नये यासाठी टोकन देऊन तक्रारदाराला बोलावले जाते. येथील लोकशाही दिनात संबंधितांची तक्रार वैयक्तिक स्वरुपाची होती. त्यामुळे विनाकारण गर्दी करुन कार्यालयात गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी जो तक्रारदार असतो, त्यानेच बोलले पाहिजे असेच लोकशाही दिनाला अभिप्रेत आहे. त्यामुळे एका एका तक्रारदाराला बोलावले होते. शिवाय लोकशाही दिनाची वेळ ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो, त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरुन अमूकच वेळेला घ्या असे होणार नाही. त्यामुळे आजच्या लोकशाही दिनी जे काही कामकाज चालले, ते शासन निर्णयानुसारच चालले असे सांगून तक्रारदारांनी केलेल्या तक्रारींचे श्री. हिले यांनी खंडन केले.
---------------------------पूर्ण