ज्ञानेश्वरीतील ‘सिंहस्थ’ उपमेने वारकरी-सिंहस्थ संबंधाची नवी चर्चा
तुकारामांच्या अभंगापलीकडे ज्ञानेश्वरीतील संदर्भ; सिंहस्थाच्या धार्मिक आणि खगोलीय संकल्पनेचा अर्थपूर्ण उल्लेख
श्याम उगले : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणीचा वारकरी संप्रदायाशी संबंध प्रामुख्याने संत तुकाराम महाराजांच्या ‘आली सिंहस्थ पर्वणी...’ या अभंगाच्या संदर्भातून चर्चिला जातो. मात्र, त्यापूर्वीच्या काळातील संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत सिंहस्थाचा गौरवपूर्ण उपमेच्या स्वरूपातील संदर्भ आढळतो. त्यामुळे वारकरी परंपरा आणि सिंहस्थ यांच्यातील संबंधाचा अभ्यास करताना हा संदर्भ महत्त्वाचा ठरू शकतो.
देशातील चार प्रमुख कुंभ-सिंहस्थ स्थळांपैकी हरिद्वार आणि प्रयागराज येथे कुंभमेळा, तर त्र्यंबकेश्वर-नाशिक आणि उज्जैन येथे सिंहस्थमेळा भरतो. या परंपरांचे प्राचीनत्व मोठे असले, तरी उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांमध्ये कुंभमेळ्याचे दाखले अधिक प्रमाणात आढळतात. सिंहस्थाच्या संदर्भात महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या लीळाचरित्रात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थानिमित्त जाण्याचा उल्लेख आढळतो.
या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरीतील संदर्भ विशेष लक्षवेधी ठरतो. ग्रंथाच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील श्लोकांना सर्व तीर्थांची, गीतेला गंगेची आणि अर्जुनाला ‘सिंहस्थाची’ उपमा दिली आहे.
‘किं श्लोक सर्वतीर्थ संघातु आला । श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन सिंहस्थु जाला । म्हणौनि ॥’
साखरे महाराज संपादित ज्ञानेश्वरी प्रतीमध्ये ही ओवी अठराव्या अध्यायातील १६७५ क्रमांकाची असून, अन्य काही प्रतींमध्ये तिचा क्रमांक १६७६ आहे.
खगोलीय संकल्पनेचा काव्यात्मक वापर
सिंहस्थाच्या धार्मिक संकल्पनेनुसार सूर्याचा सिंह राशीत प्रवेश हा पर्वणीच्या महत्त्वाच्या कालखंडाशी संबंधित मानला जातो. सर्व तीर्थे गंगेच्या आश्रयाला येतात, या संकल्पनेच्या आधारे ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील श्लोक आणि अर्जुन यांची रूपकात्मक मांडणी केली आहे. गीतारूपी गंगेत सर्व श्लोकरूपी तीर्थांचा संगम होण्यास अर्जुन कारणीभूत ठरला, असा या ओवीचा आशय आहे. यामुळे ज्ञानेश्वरीतील हा उल्लेख सिंहस्थाच्या परंपरेविषयी मध्ययुगीन महाराष्ट्रातील जाणिवेचा एक महत्त्वाचा साहित्यिक संदर्भ मानता येतो. चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातील उल्लेख आणि ज्ञानेश्वरीतील उपमा हे दोन्ही संदर्भ सिंहस्थाच्या इतिहासाचा अभ्यास करताना उपयुक्त ठरू शकतात.
मात्र, केवळ या एका ओवीच्या आधारे संपूर्ण वारकरी संप्रदायाची सिंहस्थाबाबतची भूमिका निश्चित करता येणार नाही. त्याऐवजी ज्ञानेश्वरीतील हा संदर्भ तुकाराम महाराजांच्या अभंगासह पाहिल्यास वारकरी परंपरेतील सिंहस्थाविषयीची विविधांगी मते आणि त्यांचा ऐतिहासिक संदर्भ तपासण्यास नवी दिशा मिळू शकते.