NSK26H30255 (फोटो मोठा वापरावा)
जळगाव : ए. टी. झांबरे विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी गणरायाचा पंचामृत अभिषेक करण्यात आला.
विद्यार्थ्यांकडून ३१ हजार अथर्वशीर्ष मंत्रांचे पठण
ए. टी. झांबरे विद्यालयात उपक्रम; पंचामृत अभिषेकाने परिसर भक्तिमय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२१ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त गणपती अथर्वशीर्ष पठण व पंचामृत अभिषेकाचा भक्तिमय सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थी, पालक, माता-पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमात ३१ हजारांहून अधिक अथर्वशीर्ष मंत्रांचे पठण करण्यात आले.
दुपारी तीनला सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी २१ आवर्तनांमध्ये अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. विद्यार्थ्यांच्या एकसुरातील मंत्रोच्चाराने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. सामूहिक पठणामुळे विद्यार्थ्यांना शिस्त, एकाग्रता आणि सामूहिक प्रार्थनेचा अनुभव मिळाला. या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी घरून आणलेल्या पाच गणेशमूर्तींचा विधिवत पंचामृत अभिषेक करण्यात आला. एका बाजूला अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण सुरू असताना दुसरीकडे गणरायावर पंचामृत अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चार आणि अभिषेकामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती.
कार्यक्रमाच्या बैठक व्यवस्था व नियोजनासाठी डी. ए. पाटील, बी. डी. झोपे, सी. बी. कोळी, रोहिणी पाटील, वेदप्रकाश गडदे (आर्य सर), पराग राणे, किशोर भोई आणि निराशा सोनवणे यांनी परिश्रम घेतले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाला.
चौकट
आध्यात्मिक मूल्यांची जोपासना
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, आध्यात्मिक मूल्ये व गणेशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पालक व माता-पालकांनीही सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.