तलाठ्यांचा संप कायम;
चर्चांच्या फेऱ्या निष्फळ
महसूल कामे ठप्प झाल्याने शेतकरी, नागरिकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : जिल्ह्यातील तलाठ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता. २१) दिवसभर प्रशासन आणि जिल्हा तलाठी महासंघाच्या चर्चांच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत चर्चेतून ठोस निर्णय न झाल्याने संप कायम ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतला. दरम्यान, संपामुळे महसूल विभागाशी संबंधित कामांसह विविध शासकीय सेवा ठप्प झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील एका मंडलाधिकाऱ्यासह पाच तलाठ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाभरातील तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाचा परिणाम सातबारा उतारे, ई-फेरफार, खरेदी-विक्री व्यवहार, विविध दाखले तसेच ‘सेवा पंधरवडा’अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांवर झाला आहे.
संपावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी पुढाकार घेत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यावेळी एका मंडलाधिकाऱ्यासह दोन तलाठ्यांचे निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा झाली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसह अन्य तीन तलाठ्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासंघापुढे ठेवला. मात्र, या प्रस्तावावर रात्री उशिरापर्यंत अंतिम निर्णय झालेला नव्हता.
दरम्यान, जिल्हा तलाठी महासंघ आपल्या प्रमुख मागण्यांवर ठाम आहे. निलंबनाची कारवाई बिनशर्त मागे घ्यावी, तसेच इगतपुरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांची बदली करावी, अशी महासंघाची मागणी आहे. या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधील या संघर्षाचा फटका मात्र गेल्या आठवडाभरापासून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सातबारा, फेरफार, दाखले यांसारखी दैनंदिन कामे खोळंबल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि महासंघाने चर्चेतून लवकर तोडगा काढून महसूल यंत्रणेचे कामकाज पूर्ववत करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.