धुळे टुडे २ साठी मेन...
फोटो- NSK26H30258, NSK26H30259
धुळे : संतोषी माती चौक ते फाशीपूलादरम्यानच्या रस्त्यावर सुरु असलेली डागडूजी. दुसऱ्या छायाचित्रात खड्डे बुजविल्यानंतरची स्थिती.
---
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांवर डागडूजी
---
धुळे महापालिकेकडून कार्यवाही; इतरही उपाययोजनांना गती देण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम अंतिम टप्प्यात आली असून अनंत चतुर्दशीला होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने धुळे महापालिकेसह इतर शासकीय यंत्रणांकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. मिरवणूक मार्गावर गणेश भक्तांची आणि रथ-चित्ररथांची कोंडी होऊ नये, अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी धुळे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत. महापालिकेच्या अखत्यारितील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मनपाच्या अभियांत्रिकी विभागाने दिली आहे.
धुळे शहरात गेल्या काही महिन्यांपासून काही प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागांत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच नगरसेवक, सामान्य नागरिक आणि विविध राजकीय पक्ष-संघटनांकडून हे खड्डे बुजविण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेतही सदस्यांनी खड्डे दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या उपाययोजनांवरून प्रशासनाला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेत खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.
या रस्त्यांवर डागडूजी
गेल्या काही दिवसांत दीड दिवस, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरळीत पार पडले. आता अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती आणि उरलेल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर कोणताही अडथळा येऊ नये म्हणून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. शहरातील देवपूर परिसर, जयहिंद महाविद्यालय रस्ता, पांझरा नदीकाठावरील श्री स्वामी समर्थ केंद्र ते पूल, संतोषी माता चौक ते फाशी पूल आणि पुढे दसरा मैदानापर्यंतच्या रस्त्यांची डागडुजी केली आहे. याशिवाय शहरातील मुख्य बाजारपेठेतील फुलवाला चौक, गल्ली नंबर सहा, भगवा चौक, आग्रा रोड, महात्मा गांधी पुतळा परिसर आणि झाशीची राणी पुतळा चौक या सर्व महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणांवरील खड्डे डांबरीकरण व खडी टाकून बुजविण्यात आले आहेत. महापालिकेतर्फे रस्ते दुरुस्तीचे काम जवळपास पूर्णत्वाकडे असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले यांनी सांगितले.
---